सातारा - सोलापूरमधील अकलूज येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत 14 वर्षांखालील वयोगटात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सातारा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुलांच्या संघाने विजेतेपद तर मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.
हेही वाचा - Hong Kong Open : उपांत्य फेरीत श्रीकांतचा पराभव, भारताचे आव्हान संपुष्टात
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर आणि शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूजच्या विजयसिंह मोहिते क्रीडा संकूलात या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सातारा इंग्लिश मिडियम स्कूलने अंतिम सामन्यात पुणे संघाचा ५१-२४ असा पराभव केला. कुणाल शिराळे, ध्रुव निकम, उदय भोसले, अथर्व परदेशी व वैभव कोकरे यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघाने हा सामना खिशात टाकत विजेतेपद पटकावले. त्यांना प्रणव पवार, आयन बागवान, दिगंबर शेडगे, अथर्व भिसे, प्रज्वल बांदल, अभंग पाटील, सोहम मोहिते यांनी साथ दिली.
मुलींच्या गटात चुरशीच्या झालेल्या सामन्यात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सातारा इंग्लिश मिडीयम स्कूलने उपविजेतेपद पटकावले. या संघास पुणे विभागाकडून 46- 43 असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. सातारा इंग्लिश मिडियम स्कूलच्या इफा इनामदार, ईश्वरी कुंभार, सिद्धी शिंदे, श्रावणी बादापुरे, निसर्गा सपकाळ यांनी अखेरच्या मिनिटांपर्यंत दिलेली झुंज प्रेक्षकांच्या मनात ठसून राहिली. या संघात श्रेया त्रिंबके, सई शेलार, नेहा नानुगडे, तनिष्का राजेशिर्के, श्रेया ढोणे व प्रियांका जाधव यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
यशस्वी खेळाडूंना राष्ट्रीय खेळाडू रोहन रणजीत गुजर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सौरभ शर्मा व राष्ट्रीय बास्केटबॉलपटू जिज्ञासा गुजर यांची साथ लाभली. संस्थेच्या अध्यक्षा, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अर्निका गुजर - पाटील, शिवछत्रपती पुरस्कारार्थी मुख्याध्यापिका मिथीला गुजर यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.