नवी दिल्ली : भारतीय संघाचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत विकेट घेताच एक मोठा विक्रम करणार आहे. ३६ वर्षीय रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत ८८ कसोटी सामने खेळले असून, २४.३०च्या सरासरीने ४४९ बळी घेतले आहेत. एक विकेट घेताच अश्विन कसोटीत 450 बळी घेणारा जगातील दुसरा गोलंदाज बनणार आहे.
भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचा रेकाॅर्ड : भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेने 93व्या कसोटी सामन्यात 450 विकेट घेतल्या. कसोटी इतिहासात सर्वात जलद 450 बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीधरनने आपल्या 80 व्या सामन्यात 450 बळी पूर्ण केले होते. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने 800 विकेट्स घेतल्या आहेत.
अश्विनचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विक्रम : रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण 18 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 89 विकेट घेतल्या आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच वेळा पाच बळी आणि एका सामन्यात एकदा 10 बळी घेतले आहेत. अश्विनने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटीचे वेळापत्रक : 1ली कसोटी – 9 ते 13 फेब्रुवारी, नागपूर दुसरी कसोटी – 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली तिसरी कसोटी – 1 ते 5 मार्च, धर्मशाला चौथी कसोटी – 9 ते 13 मार्च, अहमदाबाद
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया संघ : पॅट कमिन्स (क), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन, डेव्हिड वॉर्नर.