मुंबई - भारतीय कुस्ती महासंघाने २९ ऑगस्ट रोजी दिल्या जाणाऱ्या खेलरत्न पुरस्कारासाठी आपल्या खेळाडूंचे नाव पाठवली आहेत. यावेळी महासंघाने राजीव गांधी खेलरत्नसाठी एकही खेळाडूची शिफारस केलेली नाही. तर अर्जुन पुरस्कारासाठी चार नावे पाठवली आहेत.
टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला आणि विश्व चॅम्पियनशीपमध्ये पदक जिंकणारा भारताचा युवा कुस्तीपटू रवी दाहिया आणि दीपक पूनिया यांच्यासह अंशु मलिक, सरिता मोर यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आली आहेत.
दीपक पूनियाने नूर सुल्तान २०१९ विश्व चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. याच स्पर्धेत रवी दाहिया याने कांस्य पदकाची कमाई केली होती. या कामगिरीसह दोन्ही कुस्तीपटू आपापल्या वजनी गटामध्ये टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते.
रवी दाहियाने काही दिवसांपूर्वीच अल्माटीमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत यशस्वी बचाव केला होता आणि पोलंड ओपनमध्ये रौप्य पदक जिंकले होते. डब्ल्यूएफआयने १९ वर्षीय अंशु मलिक हिच्या नावाची देखील शिफारस केली आहे. तिने मागील वर्षी सहा स्पर्धेत पाच पदके जिंकली होती. यात आशियाई स्पर्धेतील पदकाचा देखील समावेश आहे.
ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी हुकलेली पण अल्माटीमध्ये झालेल्या स्पर्धेत ५९ किलो वजनी गटात विजेतेपद पटकावणारी सरिता मोर हिच्या नावाची देखील अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
हेही वाचा - जुग जुग जीयो ! सोनू सूदने गरजू नेमबाजला पाठवली महागडी रायफल
हेही वाचा - WI vs SA ३rd T२०: अखेरच्या चेंडूवर षटकार आणि श्वास रोखून धरायला लावणारे ६ चेंडू