टोकियो - कोरोना विषाणूचा प्रसार असाच वाढत राहिला, तर टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याशिवाय, कोणताच पर्याय राहणार नसल्याची, कबुली जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी दिली आहे.
आबे म्हणाले की, 'कोरोनामुळे उद्भवलेली सद्य परिस्थिती पाहता ऑलिम्पिकचे आयोजन करणे कठीण आहे. आम्ही खेळाडूंच्या आरोग्याच्या हिताचा निर्णय घेऊ. पण, ऑलिम्पिक पुढे ढकलणे हा चांगला पर्याय नाही.'
दरम्यान, ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात यावे, अशी मागणी संपूर्ण जगातून जोर धरु लागली आहे. याला आंतरराष्ट्रीय खेळाडू संघानेही पाठिंबा दर्शवला आहे. तसेच कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाने आपले खेळाडू या स्पर्धेसाठी पाठवणार नसल्याचे जाहीर केलं आहे.
सर्व परिस्थिती पाहता जपानचे सरकार नरमले असून प्रथमच ऑलिम्पिकचे आयोजन लांबणीवर टाकण्याचे संकेत त्यांनी दिलं आहे. २४ जुलै ते ९ ऑगस्ट या दरम्यान ही ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित आहे.
कोरोना विषाणूमुळे जगात चिंतेचे वातावरण आहे. चीनमधून प्रसार झालेल्या या विषाणूने १४ हजाराहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. तर दोन लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. जपानमध्येही कोरोनामुळे ४४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - कोरोनामुळे आमचा संघ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार नाही, 'या' देशानं केलं जाहीर
हेही वाचा - 'मोदीजी रविवारी ५ वाजता तुम्ही काय केले..? व्हिडिओ शेअर करा आम्हालाही पाहू द्या'