नवी दिल्ली - पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती दीपा मलिकने सोमवारी निवृत्तीची घोषणा केली. राष्ट्रीय क्रीडा संहितेचे पालन करून पॅरालिम्पिक समितीच्या (पीसीआय) अध्यक्षपदासाठी दीपाने निवृत्ती घेतली आहे. राष्ट्रीय क्रीडा नियमांनुसार सध्याचा कोणताही खेळाडू फेडरेशनमध्ये अधिकृत पद घेऊ शकत नाही.
दीपाने ट्विटरवर म्हटले, "मी निवडणुकीसाठी पीसीआयला खूप आधी पत्र पाठवले होते. नवीन समितीला मान्यता देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाची मी वाट पाहत होते आणि आता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मान्यता मिळवण्यासाठी मी निवृत्तीची घोषणा करत आहे. पॅरालिम्पिकपटू आणि उर्वरित खेळाडूंना मदत करण्याची वेळ आली आहे."
पॅरालिम्पिक खेळांमध्ये पदक जिंकणारी दीपा ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे. 2016च्या रिओ पॅरालिम्पिकमध्ये दीपाने गोळाफेकमध्ये रौप्यपदक जिंकले होते. गेल्या वर्षी 29 ऑगस्ट रोजी तिला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारी ती भारताची दुसरी पॅरालिम्पिकपटू ठरली होती. तिच्या आधी भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाने 2017 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता.
यापूर्वी दीपाला 2012 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2017 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. 49 वर्षीय दीपाने 58 राष्ट्रीय आणि 23 आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.