इस्तांबूल - भारताची बॉक्सिंगपटू निखत झरीनने विश्वविजेती रशियाच्या बॉक्सिंगपटूला धूळ चारत, बॉस्फोरस बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ५१ किलो वजनी गटाच्या सामन्यात निखतने पल्टेसेवा एकटेरिनाचा ५-० ने पराभूत केले.
आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्यपदक विजेती निखतचा पुढील सामना दोन वेळा विश्वविजेती कझाकिस्तानच्या कझायबे नाझिमशी होणार आहे. निखतशिवाय, २०१३ आशियाई चॅम्पियन शिवा थापा, सोनिया लादर आणि परवीन यांनीही आपापल्या सामन्यात विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. शिवाने पुरुषांच्या ६३ किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या सामगुलोव बागटीओव्हला ३-२ असे पराभूत केले.
महिला गटाच्या दुसर्या फेरीत विश्व चॅम्पियनशीपमध्ये रौप्यपदक विजेती सोनियाने ५७ किलो वजनी गटात सुरमेनेली तुगकेनाझचा ५-० ने पराभव केला. तर ६० किलो वजनी गटात परवीनने ओजिओल एसेराचा ५-० असा धुव्वा उडवला. दरम्यान, दुर्योधन नेगी (६९ किलो), ब्रिजेश यादव (८१ किलो) आणि किशन शर्मा (९१ किलो) या बॉक्सिंगपटूंना सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
हेही वाचा - बजरंग पुनिया ठरला जगातील अव्वल कुस्तीपटू
हेही वाचा - ऑलिम्पिक क्वालिफायर ट्रायलमधून सुशील कुमारची माघार