नवी दिल्ली - नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) खेळाडूंना दर तीन महिन्यांनी त्यांच्या मुक्कामाविषयी माहिती देण्यास सांगितले आहे. जर खेळाडूंनी असे केले नाही तर त्यांना निलंबित देखील केले जाऊ शकते, असेही नाडाने सांगितले.
बुधवारी नाडाने एक निवेदन जारी केले आहे. ज्या खेळाडूंनी त्यांच्या मुक्कामाविषयी माहिती दिली नाही त्यांनाही नोटीस दिली आहे. जर खेळाडू अशा तीन नोटिसांना प्रतिसाद देण्यात अपयशी ठरला तर त्याला चार वर्षांसाठी निलंबित केले जाऊ शकते, असे निवेदनात म्हटले गेले आहे.
नाडाने सांगितले, "नाडाच्या एनआरटीपीमध्ये येणाऱ्या सर्व खेळाडूंना दर तीन महिन्यांनी आगाऊ सूचना द्याव्या लागतील. जे असे करण्यास असमर्थ आहेत त्यांना नोटीस दिली जाईल."
अलीकडे, महिलांच्या 400 मीटर शर्यतीतील जगज्जेती धावपटू सलवा ईद नासरला स्वत:ला डोपिंग चाचणीसाठी उपलब्ध न केल्याबद्दल निलंबित करण्यात आले. नासरने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई केली गेली असल्याचे अॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने सांगितले आहे. जर हे प्रकरण सिद्ध झाले तर नासर पुढच्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकणार नाही.
महत्त्वाचे म्हणजे, नासरने ऑक्टोबरमध्ये 48.14 सेकंदासह जागतिक जेतेपद जिंकले होते. 1985 नंतर अशी वेळ नोंदवणारी नासर ही पहिली महिली धावपटू आहे.