नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी याची घोषणा केली. यात सर्व स्पर्धांसह पात्रता सामन्यांचाही समावेश आहे.
रिजिजू यांनी सांगितलं की, 'कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे आज सर्व स्पर्धा रद्द करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. या स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत बंद राहतील. यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.'
आयपीएल स्पर्धेबाबत रिजिजू यांनी सांगितलं की, 'बीसीसीआय क्रिकेट संबंधी निर्णय घेते. क्रिकेट ऑलिम्पिकचा क्रीडा प्रकार नाही. पण, हा फक्त एक स्पर्धेचा विषय नसून तो लोकांच्या आरोग्याचा विषय आहे. या स्पर्धेत हजारोंच्या संख्येने लोक येतात. यामुळे हे खेळाडूशिवाय लोकांच्या सुरक्षेची बाब आहे. केंद्र शासनाकडून आयपीएल संदर्भात १५ एप्रिलनंतर योग्य निर्णय घेतला जाईल.'
कोरोनाच्या धोक्यामुळे बीसीसीआयने २९ मार्चपासून सुरू होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सद्य परिस्थिती पाहता आयपीएल स्पर्धा १५ एप्रिल पासून सुरू होईल, असे वाटत नाही.
दरम्यान, चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे ८ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगातील १५० हून अधिक देशांमध्ये या विषाणूचा फैलाव झाला असून जगभरात दीड लाखांहून अधिक लोकांना यांची लागण झाली आहे. भारतातही कोरोनाचे १६८ हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर या विषाणूमुळे भारतात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने यावर उपाययोजना करत आहे.
हेही वाचा - पाकिस्तान सुपर लीग : 'त्या' १२८ जणांची कोरोना चाचणी, समोर आला अहवाल'
हेही वाचा - कोरोनाची भीती वाटते? भिऊ नका क्रिकेट खेळायला आमच्याकडे या'