पुणे - महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आयोजकांनी मोठ्या बक्षीस रकमेची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवधन सदगीरला महाराष्ट्र केसरी किताबाची मानाची चांदीची गदा वगळता कुठलेही रोख पारितोषिक मिळलेले नाही. तसेच इतर विजेत्यांना घोषित रोख रकमा मिळालेल्या नाही, असा गौप्यस्फोट अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू आणि कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांनी केला आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघाने आज (गुरुवार) महाराष्ट्र्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेता शैलेश शेळके यांचे प्रशिक्षक काका पवार यांचा वार्तालाप आयोजित केला होता. यावेळी काका पवार यांनी हा गौप्यस्फोट केला.
यंदा झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ वजन गटात काका पवार यांचे पठ्ठे माती आणि गादी गटात सुवर्णपदक विजेते ठरले. तर महाराष्ट्र केसरीची गदा देखील काका पवार यांचा पठ्ठा हर्षवर्धन सदगीरने पटकावली आहे.
यंदा ही स्पर्धा सिटी ग्रुप सारख्या मोठ्या उद्योग समूहाने प्रायोजित केली होती. तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने, महाराष्ट्र केसरी विजेत्याला दीड लाख रूपयाचे बक्षिस जाहीर केले होते. मात्र विजेत्याला घोषित रक्कम अद्याप मिळालेली नाही, असे काका पवार यांनी सांगितले. दरम्यान, पुढील पाच वर्षांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात करण्याचा करार देखील सिटी ग्रुपने केला आहे.
हर्षवर्धनला केवळ सुवर्णपदक विजेत्यासाठीचे २० हजार रुपये देण्यात आले आहेत. तर माती गटात सुवर्णपदक विजेता असलेल्या शैलेश शेळकेला मात्र अद्याप कुठलीही रोख रक्कम मिळालेली नाही, असेही काका पवार यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य कुस्तीगीर संघटनेने काका पवार यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. महाराष्ट्र केसरी विजेता व उपविजेता मल्लास गदा, ट्रॉफी व्यक्तीरिक्त कोणत्याही प्रकारची अधिक बक्षिसे जाहीर करण्यात आली नव्हती, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने दिले आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनाचा सर्व खर्च यंदा पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकासक सिटी कॉर्पोरेशनने उचलला होता. ज्यामध्ये प्रत्येक वजनी गटातील सुवर्ण पदक विजेत्यास २० हजार, रौप्य पदक विजेत्यास १० हजार व कांस्य पदक विजेत्यास ५ हजार रोख बक्षिस देण्याचे ठरले होते.