नवी दिल्ली - गोव्याचा लिओन मेंडोका भारताचा ६७वा ग्रँडमास्टर ठरला आहे. कोरोनामुळे १४ वर्षीय लिओन मार्चपासून युरोपमध्ये अडकला होता. तीन महिन्यांत त्याने १६ स्पर्धा खेळल्या. यात त्याने त्याची इलो रेटिंग १४० गुणांपर्यंत वाढवली.
हेही वाचा - आता फक्त हॅमिल्टन नव्हे, तर 'सर' लुईस हॅमिल्टन
या कामगिरीबद्दल अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने (एआयसीएफ) लिओनला ग्रँडमास्टर पदवी दिली. लिओन सध्या १४ वर्षे ९ महिने आणि १७ दिवसांचा आहे. इतक्या कमी वयात ग्रँडमास्टर पदवी मिळवणारा लिओन हा जगातील २९वा खेळाडू ठरला आहे.
यंदा ग्रँडमास्टर होणारा लिओन हा दुसरा खेळाडू आहे. लिओन अगोदर जी. आकाशला ही पदवी मिळाली होती. एका वृत्तसंस्थेशी बोलताना लिओन म्हणाला, "माझ्या यशात बर्याच लोकांनी योगदान दिले आहे. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आशीर्वादाबद्दल देव, आई-वडील, बहिणीचे आभार."