मुंबई - भारतात दरवर्षी अनेक विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. इथली संस्कृती, निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी अनेकजण भारताची वारी करण्यासाठी आतुर असतात. परंतू, एखाद्या माणसाला अनोळख्या जागेसंबधी जेवढे आकर्षण असते तेवढीच त्या जागेसंबंधी भीतीही दडलेली असते.
हेही वाचा - लंकेला मिळाला नवीन मलिंगा, पदार्पणातच घेतले ७ धावांत ६ बळी..पाहा व्हिडिओ
पर्यटकांची हीच भीती दूर करण्यासाठी एक अवलिया भारतात आला आहे. भारत सुरक्षित असल्याचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी त्यांनी दिल्ली ते मुंबई असा चक्क दीड हजार किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला. या अवलियाचे नाव जी फोंग असे असून ते तैवान या देशातून भारतात आले आहेत.
५७ वर्षीय जी फोंग यांनी केलेल्या या भीमपराक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 'भारत हा सुरक्षित नाही, असा समज अनेक परदेशी पर्यटकामध्ये आहे. मात्र हाच संदेश खोटा ठरवण्यासाठी मी दिल्ली ते मुंबई असे दीड हजार किलोमीटर चा प्रवास सायकलवरून केला. शिवाय, येथील माणसेही खूप प्रेमळ आहेत', असे फोंग यांनी सांगितले.
फोंग हे काही दिवसांपूर्वी भारतात आले होते. दिल्लीत उतरल्यानंतर त्यांनी सायकलवरून मुंबई गाठण्याचे लक्ष्य समोर ठेवले. त्यानंतर जयपूर ,उदयपूर ,गुजरात असा प्रवास करत ते मुंबईत पोहोचले. २३ दिवसात त्यांनी दिल्ली ते मुंबई हा प्रवास पूर्ण केला. फोंग यांनी एकट्याने केलेल्या या प्रवासानंतर परदेशी पर्यटकाच्या मनात असलेल्या भारताबद्दल असलेला संशय दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे.