चेन्नई - प्रवासी निर्बंधामुळे देशात परत येण्यास असमर्थ असलेल भारताचा युवा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू लिओन ल्यूक मेंडोंकाने आपल्या वेळेचा चांगला उपयोग केला आहे. मेंडोंकाने सर्बियातील पारासिन ओपनमध्ये दुसरे स्थान पटकावले.
गोव्याच्या 14 वर्षीय मेंडोंकाने (ईएलओ रेटिंग 2470) नऊ फेऱ्यांमध्ये सात गुण मिळवले. लॉकडाऊनमुळे भारतात येण्याची परवानगी नसल्यामुळे तो तीन महिन्यांपासून वडील लिंग्डन यांच्यासह हंगेरीत अडकला आहे.
जूनमध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या बालाटन बुद्धिबळ महोत्सव स्पर्धेत त्याने विजय मिळवला होता. गुरुवारी झालेल्या पारासिन ओपनच्या सामन्यात त्याने दुसरे स्थान मिळवले. ''माझ्या कामगिरीने मी आनंदी आहे'', असे मेंडोंकाने या सामन्यानंतर सांगितले.
तामिळनाडूचा आकाश ठरला देशाचा 66 वा ग्रँडमास्टर -
भारताचा बुद्धिबळपटू जी. आकाश हा देशाचा 66वा ग्रँडमास्टर ठरला आहे. तर, गोव्याचा अमेया ऑडी आंतरराष्ट्रीय मास्टर ठरला आहे. जागतिक बुद्धिबळ महासंघाने (एफआयडीई) नुकत्याच झालेल्या बैठकीत आकाशच्या ग्रँडमास्टर किताबाची माहिती दिली होती.