इंदूर - भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तिसरा वन डे सामना 24 जानेवारीला इंदूरच्या होळकर मैदानात खेळवण्यात येणार आहे. यापूर्वीचे दोन्ही एकदिवसीय सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. त्यामुळे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ न्यझीलंड संघाला क्लिन स्विप देण्याच्या इराद्यानेच खेळण्यासाठी मैदानात उतरेल. दुसरीकडे मात्र न्यूझीलंड संघ भारतावर मात करण्यासाठी उत्सुक असेल. मात्र इंदूरच्या होळकर मैदानावर भारताने एकही सामना अद्याप हरला नाही. त्यामुळे या मैदानावर भारतीय संघाचे पारडे जड असल्याने मानले जाते.
भारतीय संघाची होळकर मैदानावर जबरदस्त कामगिरी : भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत होळकर मैदानावर जबरदस्त कामगिरी केली. या मैदानावर भारतीय क्रिकेट संघ कधीच सामना हरला नाही. इतकेच नाही, या मैदानावर भारताचा जबरदस्त फलंदाज विरेंद्र सेहवागने सर्वोच्च धावसंख्या उभारली होती. त्यामुळे भारतीय संघाचे या मैदानावर पारडे जड असल्याचे भाकित वर्तवण्यात येत आहे. भारतीय संघ 2006 मध्ये इंग्लंडविरुद्ध या मैदानात खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर 7 विकेट राखून विजय मिळवला होता. आतापर्यंत भारतीय संघ या मैदानात 5 सामने खेळला आहे. मात्र या पाचही सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. भारतीय संघाने या मैदानावर वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियालाही या मैदानात धूळ चारली आहे.
या मैदानावर विरेंद्र सेहवागचे दुहेरी शतक : भारतीय संघाने होळकर मैदानावर आतापर्यंत उत्कृष्ट खेळ केला आहे. त्यामध्ये अनेक भारतीय खेळाडूंनी हे मैदान गाजवले आहे. त्यात भारताचा तडाखेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग याने एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च खेळी याच मैदानावर केली आहे. विरेंद्र सेहवागने 220 धावसंख्या याच मैदानावर केली होती. इतकेच नाहीत त्याने याच मैदानावर दुहेरी शतक करण्याचा पराक्रमही केला आहे.
होळकर मैदानावर भारतीय संघाचे रेकॉर्ड : भारतीय संघाचा सिक्सर किंग युवराज सिंगने या मैदानावर जबरदस्त खेळ केला आहे. युवराज सिंगने या मैदानावर खेळताना दोन सामन्यात 181 धावा केल्या आहेत. तर भारतीय संघाचा तत्कालिन सलामीविर गौतम गंभीरने दोन सामन्यात 137 धावा कुटल्या आहेत. भारतीय संघाचा युवा फलंदाज अजिंक्य रहाणे यानेदेखील या मैदानावर चांगली फलंदाजी केली आहे. अजिंक्यने या मैदानावर 121 धावा केल्या आहेत. तर भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्माने या मैदानावर 104 धावा पटकावल्या आहेत. दुसरीकडे भारतीय संघाने वेस्ट इंडीज संघावर या मैदानातच जबरदस्त विजय संपादन केला आहे. भारतीय संघाने 2011 मध्ये वेस्ट इंडीज संघावर 153 धावांनी विजय संपादन केला होता. भारतीय संघाने अगोदर फलंदाजी करताना 418 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ 265 धावांवरच गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले होते.
हेही वाचा - Athiya Shetty KL Rahul Wedding : केएल-अथिया अडकणार लग्नबंधनात, 'या' अभिनेत्रींनी स्टार क्रिकेटर्सला बनवले जोडीदार