हैदराबाद - अनुभवी धर्मराज चेरलाथनच्या नेतृत्वाखाली हरियाणा स्टीलर्सच्या संघाने पुणेरी पलटनला धक्का देत आपले विजयाचे खाते उघडले. 34-24 च्या फरकाने हरियाणाने सामन्यात बाजी मारत यंदाच्या हंगामातील पहिला विजय साध्य केला.
हरियाणा स्टीलर्सचा नवीन या सामन्यात प्रमुख आकर्षण ठरला. त्याने चढाईत तब्बल 14 गुणांची कमाई केली. सामन्याच्या पहिल्या सत्रात आठ मिनिटांपर्यंत दोन्ही संघ 6-6 गुणांनिशी समान पातळीवर होते. मात्र, नवीनच्या आक्रमक चढाईमुळे पुणेरी संघावर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढवली. त्यानंतर सेल्वामनीने केलेल्या चढाईमुळे परत एकदा पुण्याचा संघ सर्वबाद झाला. या दोघांव्यतिरिक्त विकास काळेने हरियाणासाठी 4 गुणांची कमाई केली.
दुसऱ्या सत्रात, पुण्याच्या पवन काडियानने लीगमधील 600 चढाईचे गुण पूर्ण केले. या सत्रापूर्वी हरियाणा संघाकडे 27-16 अशी आघाडी होती. पुढच्या कालावधीत हीच आघाडी कायम ठेवत हरियाणा स्टीलर्सच्या संघाने 34-24 च्या फरकाने पुणेरी पलटन संघावर बाजी मारली.