दोहा : गतविजेत्या फ्रान्सने 1998 मध्ये पहिला विश्वचषक जिंकल्यापासून ग्रुप स्टेजमधील त्यांचे तीनही सामने कधीच जिंकलेले नाहीत. परंतु आज ट्युनिशियाविरुद्ध त्यांची आपल्या विजयाची मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. तर दुसरीकडे ट्युनिशियाने आतापर्यंतच्या विश्वचषकाच्या इतिहासात एकूण तीन सामनेही जिंकलेले नाहीत. यावेळी त्यांना बाद फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी फ्रान्सला पराभूत करावे लागेल. ट्युनिशियाचे प्रशिक्षक जलेल कादरी यांना या दडपणाची जाणीव आहे. (FIFA World Cup 2022). (FIFA WORLD CUP 2022 match preview).
तर प्रशिक्षकपद सोडेन.. : फ्रान्सचे प्रशिक्षक डिडिएर डेसचॅम्प्स म्हणाले की, माझी परिस्थिती कादरींसारखी नाही. पण ते कोणतीही कसर सोडणार नाहीत. कादरी यांनी स्पर्धेपूर्वी सांगितले होते की, ग्रुप स्टेजच्या पुढे जाणे हे त्यांचे वैयक्तिक ध्येय आहे. तसे न झाल्यास ते प्रशिक्षकपद सोडतील. फ्रान्सने सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात आपले पहिले दोन सामने जिंकून बाद फेरीत प्रवेश केला आहे. त्यांना ड गटात अव्वल स्थान मिळवण्यासाठी फक्त सामना बरोबरीत राखण्याची आवश्यकता आहे.
फ्रान्सचे पारडे जड : दोन्ही संघांची आतापर्यंतची कामगिरी पाहता या लढतीत फ्रान्सला विजय मिळवणे अवघड जाणार नाही. फ्रान्सने आतापर्यंत दोन सामन्यांत सहा गोल केले आहेत. यापैकी तीन गोल किलियन एमबाप्पेने तर दोन गोल ओलिव्हर जिरुडने केले. तर दुसरीकडे ट्युनिशियाला आतापर्यंत स्पर्धेत एकही गोल करता आलेला नाही. ते डेन्मार्कविरुद्धचा सामना गोलरहित बरोबरीत खेळले तर ऑस्ट्रेलियाने त्यांना 1-0 ने पराभूत केले. ट्युनिशिया आतापर्यंत पाच विश्वचषकांत खेळला आहे. परंतु त्यांना अजून एकदाही बाद फेरी गाठता आलेली नाही. विश्वचषक स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत केवळ दोन विजयांची नोंद केली आहे. यातील पहिला विजय 1978 मध्ये मेक्सिकोविरुद्ध आणि दुसरा चार वर्षांपूर्वी रशियामध्ये पनामाविरुद्ध.
सामन्याची वेळ : 30 नोव्हेंबर 2022, रात्री 8:30, एज्युकेशन सिटी स्टेडियम
डेन्मार्क विरुद्ध ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया आज जेव्हा डेन्मार्क विरुद्ध लढतीत उतरेल तेव्हा विश्वचषकात दुसऱ्यांदा अंतिम 16 मध्ये स्थान मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. ऑस्ट्रेलियाने शनिवारी ट्युनिशियाचा पराभव केला, जो विश्वचषकातील 18 सामन्यांमधील त्यांचा केवळ तिसरा विजय होता. या विजयासह त्यांनी बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. आता ऑस्ट्रेलियासमोर त्यापेक्षाही मोठे लक्ष्य आहे, ते म्हणजे अंतिम 16 मध्ये स्थान मिळवणे. 2006 मध्ये ते एकदाच बाद फेरी गाठू शकले आहेत. युरो 2020 च्या उपांत्य फेरीत पोहोचलेल्या डेन्मार्कचा सामना आता ऑस्ट्रेलियाशी होणार असून हा सामना जिंकणारा संघ पुढील फेरीत प्रवेश करेल. ऑस्ट्रेलियन संघ फ्रान्सकडून पराभूत झाला होता, पण त्यांनी ट्युनिशियाचा पराभव केला होता. दुसरीकडे, डेन्मार्कने ट्युनिशियाविरुद्ध गोलरहित बरोबरी साधली होती तर त्यांना फ्रान्सकडून 2-1 असा पराभव पत्करावा लागला होता.
सामन्याची वेळ : 30 नोव्हेंबर 2022, रात्री 8:30, अल जानूब स्टेडियम