नवी दिल्ली - भारतीय अॅथलिटनी नैरोबी येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स अंडर-20 स्पर्धेत दमदार कामगिरी केली. या स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात की, 'आपल्या अॅथलिटनी जागतिक अॅथलेटिक्स अंडर-20 स्पर्धेत नैरोबीमध्ये दोन रौप्य आणि कास्य पदक जिंकले. त्यांचे अभिनंदन. संपूर्ण देशात अॅथलेटिक्स लोकप्रिय होत आहे आणि हे येणाऱ्या काळासाठी चांगले संकेत आहेत. आपल्या कष्टाळू अॅथलिटना शुभेच्छा.'
दरम्यान, भारताची महिला खेळाडू शैली सिंह हिने रविवारी अंडर-20 जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत लांब उडीमध्ये रौप्य पदक पटकावले. तर स्वीडनची सध्याची युरोपियन कनिष्ठ चॅम्पियन माजा अस्काग हिने 6.60 मीटर उडी घेऊन सुवर्णपदक जिंकले. युक्रेनच्या मारिया होरिलोव्हा 6.50 मीटर उडीसह कास्य पदकाची मानकरी ठरली.
भारताचा धावपटू अमित खत्रीने या स्पर्धेच्या 10,000 मीटर रेस वॉकमध्ये रौप्य पदक जिंकले. तर मिस्क्ड रिले संघाने 4x400 मीटरमध्ये कास्य पदकाची कमाई केली. दरम्यान, भारत या स्पर्धेच्या पदक तालिकेत 21 व्या स्थानावर राहिला.
हेही वाचा - Asian Junior Championships: दुबईत भारतीय बॉक्सिंगपटूंची छाप, आणखी 4 खेळाडू उपांत्य फेरीत
हेही वाचा - shaili singh : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 'शैली'ची रुपेरी चमक