दुबई - भारताचा विश्वमित्र चोंगथम याने एएसबीसी आशियाई युवा बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. त्याने पुरूष 51 किलो वजनी गटात हा कारनामा केला. विश्वमित्रने अंतिम सामन्यात उज्बेकिस्तानच्या कुजीबोव अहमदजोन याचा 4-1 ने पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. दुसरीकडे विश्वनाथ सुरेशचा अंतिम सामन्यात पराभव झाला. यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
भारतीय बॉक्सर विश्वमित्र चोंगथम याने अंतिम सामन्यात सुरूवातीपासूनच उज्बेकिस्तानच्या बॉक्सरवर वर्चस्व निर्माण केले होते. त्याने सामन्यात प्रभावी बचावात्मक टेकनिक तसेच सुंदर फुटवर्क दाखवला. या सामन्यात दोन्ही बॉक्सिंगपटूनी जोरदार खेळ केला. परंतु विश्वमित्र यात वरचढ ठरला. त्याने संपूर्ण सामन्यात संयम राखत सुवर्ण पदक जिंकण्यासाठी अचूक पंच मारले.
दुसरीकडे भारताचा विश्वनाथ सुरेशचा कजाकिस्तानच्या युवा विश्व चॅम्पियन संजर ताशकेनबे याने पराभव केला. 48 किलो वजनी गटात झालेल्या सामन्यात विश्वनाथ सुरेशचा 5-0 ने पराभव झाला. या पराभवामुळे विश्वनाथ सुरेशला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
वंशज (64 किलो), जयदीप रावत (71 किलो) आणि विशाल (80 किलो) पुरूष गटाच्या अंतिम सामन्यात खेळणार आहेत. तर निवेदिता कार्की (48 किलो), तमन्ना (50 किलो), सिमरन वर्मा (52 किलो), नेहा (54 किलो), प्रीती (57 किलो), प्रीती दहिया (60 किलो), खुशी (63 किलो), स्नेहा कुमारी (66 किलो), खुशी (75 किलो) आणि तनीशबीर कौर संधू (81 किलो) या महिला गटात सुवर्ण पदकासाठी भिडतील.
पाच भारतीय बॉक्सिंगपटूंनी उपांत्य फेरी गाठत युवा गटामध्ये कास्य पदक जिंकले आहे. दरम्यान, या स्पर्धेत भारतीय संघ पदक तालिकेत 19 पदकासह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या पुढे उज्बेकिस्तान (22) आणि कजाकिस्तान (25) आहे.
हेही वाचा - Exclusive: पॅरा अॅथलिट पहिल्यापासूनच रिअल हिरो आहेत, सुवर्णपदक विजेत्या अवनीच्या वडिलांची प्रतिक्रिया
हेही वाचा - Tokyo Paralympics : मानलं रे पठ्ठ्या! विश्वविक्रमासह सुमित अंटिलने जिंकले सुवर्ण पदक