नवी दिल्ली - कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाने (आयटीटीएफ) ३० जूनपर्यंत सर्व स्पर्धा स्थगित केल्या आहेत. या निर्णयाव्यतिरिक्त आयटीटीएफने मार्च २०२०ची रँकिंग यादीही स्थगित करण्याचा निर्णयही घेतला आहे.
आयटीटीएफ कार्यकारी समितीने रविवारी कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस कार्यक्रमांवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा केली. कोरोनामुळे देशभर सुरू असलेल्या अनिश्चिततेमुळे आणि टोकियो ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याने आयटीटीएफ कार्यकारी समितीने ३० जूनपर्यंत आंतरराष्ट्रीय दौरा असलेल्या स्पर्धा निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे आयटीटीएफने म्हटले.
कोरोनाचा परिणाम दिवसेंदिवस वाढत असून या व्हायरसची झळ क्रीडाक्षेत्रालाही बसत आहे. जगभरात ३३ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून या व्हायरसची लागण झालेल्या लोकांची संख्या सात लाखांच्या पुढे गेली आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर गेल्या २४ तासांत कोरोना व्हायरसची १०७ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.