नवी दिल्ली - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिग्गज हॉकीपटू पद्मश्री बलबीर सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते भारताचे महान हॉकीपटू बलबीर सिंग दोसांज (बलबीर सिनियर) यांचे सोमवारी मोहालीमध्ये निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. 8 मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बलबीर सिंग यांच्या योगदानाची अमरिंदर सिंह यांनी आठवण काढली. भारतीय क्रीडा विश्व त्यांना विसरु शकत नाही, असे ते म्हणाले. पंजाबचे क्रीडामंत्री राणा गुरमीतसिंग सोधी यांनी बलबीर सिंग यांना भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे. त्याच वेळी, मोहाली स्टेडियमला त्यांचे नाव देण्याचेही सोधी यांनी जाहीर केले.
बलबीर सिंग 1948, 1952 आणि 1956 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते. ते 1952 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे ध्वजवाहक बनले होते. या स्पर्धेत भारताने एकूण 13 गोल केले. यातील तब्बल 9 गोल बलबीर यांनी केले. यात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील हॅट्ट्रिकचा समावेश आहे. नेदरलँडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यांनी 5 गोल केले. अंतिम सामन्यात एका खेळाडूंने केलेले हे सर्वाधिक गोल आहेत. हा एक विक्रम आहे. आजघडीपर्यंत कोणत्याही हॉकीपटूला हा विक्रम मोडता आला नाही. भारताने हा सामना 6-1 ने जिंकला होता.
बलबीर यांना 1956 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. भारत सरकारने त्यांना 1957 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. दरम्यान, बलबीर सिंग 1975 सालच्या विश्व कप विजेत्या संघाचे, संघ मॅनेजरही होते. या संघाचे नेतृत्व अजीत पाल सिंग यांनी केले.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने, आधुनिक ऑलिम्पिक इतिहासातील 16 महान खेळाडूची निवड केली होती. यात बलबीर सिंग यांचाही समावेश आहे.