नवी दिल्ली - आगामी ऑलम्पिंक स्पर्धा जपानच्या टोकियोमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेला २४ जुलै २०२० पासून सुरूवात होणार असून या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचा समावेश 'अ' गटात करण्यात आला आहे. सलामीला भारतीय संघाचा सामना ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाशी होणार आहे. अर्जेंटिनानंतर भारतीय संघाला आपल्या गटात ऑस्ट्रेलिया, स्पेन आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांशी झुंज द्यावी लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने शनिवारी टोकियो ऑलिम्पिकमधील हॉकीसाठीची गटवारी घोषित केली. यानुसार भारतीय संघाचा अ गटात समावेश करण्यात आला आहे. २०२० च्या टोकियो ऑलिम्पिकमधील हॉकी स्पर्धेत जगातील १६ टॉपचे संघ खेळणार आहेत. जागतिक पाचव्या मानांकित भारतीय संघाला 'अ' गटात स्थान देण्यात आले आहे.
भारतीय संघाला अ गटात मोठा कस लागणार आहे. कारण त्यांच्या गटात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यजमान जपान या संघांचा समावेश आहे. भारतीय संघाने भुवनेश्वर येथे पार पडलेल्या पात्रता लढतीत रशियाचा ११-३ असा धुवा उडवत टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे.
पुरुष ब गटात बेल्जियम, नेदरलँड , जर्मनी, इंग्लंड , कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. २०२० टोकियो ऑलिम्पिक हॉकीच्या लढती २५ जुलै ते ७ऑगस्ट २०२० या कालावधीत टोकियोच्या नव्या ओआई स्टेडियमवर खेळवल्या जाणार आहेत.
जागतिक मानांकनात नवव्या स्थानावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचाही ऑलिम्पिक अ गटात समावेश करण्यात आला आहे. भारताच्या या गटात माजी विजेता इंग्लंड, जागतिक अग्रमानांकित नेदरलँड, जर्मनी, आयरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. तर ब गटात ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड, स्पेन, चीन और यजमान जपान हे संघ खेळणार आहेत.