टोकियो - ऑलिम्पिकसाठीच्या सराव हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघ परत विजयी रुळावर परतला आहे. भारताने जपानला ६-३ ने हरवत या स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली.
यजमान जपानविरुद्ध भारताने सुरुवातीपासूनच दमदार खेळ केला. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला युवा खेळाडू नीलकांता शर्माने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चार मिनिंटाच्या फरकाने नीलम शेसने गोल करत ही आघाडी वाढवली. भारताचे आक्रमण जपान रोखू शकला नाही. सामन्याच्या नवव्या मिनीटाला मनदीप सिंगने गोल करत भारताचा गोलफलक ३-० असा केला.
दुसऱ्या सत्राच्या केनतारो फुकूदाने जपानसाठी गोल केला. पण त्यानंतर लगेचच मनदीप सिंगने दोन गोल करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्यानंतर, जपानच्या केन्ता तनाकाने गोल करत जपानला दुसरा गोल मिळवून दिला. भारतासाठी सहावा गोल गुरसाहिबजीतसिंगने केला आहे.
याअगोदर, पहिल्या सामन्यात भारताने मलेशियाचा ६-० ने परभव केला होता. त्यानंतरच्या सामन्यात मात्र भारताला न्यूझीलंडकडून २-१ ने निसटता पराभव स्विकारावा लागला होता.