नवी दिल्ली - हॉकी इंडियाने कोरोना व्हायसविरूद्धच्या लढ्यात ओडिशाच्या मुख्यमंत्री मदत निधीला २१ लाख रुपयांची देणगी दिली आहे. हॉकी इंडियाने यापूर्वी पंतप्रधान मदत निधीमध्ये एकूण एक कोटी रुपयांचे योगदान दिले होते आणि आता त्यांनी ओडिशा सरकारलाही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
ओडिशामध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत आणि हॉकी इंडिया कार्यकारी मंडळाने राज्य सरकारला मदत करण्यासाठी हे योगदान देण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद म्हणाले, “सध्या आपण सर्वजण या संकटाचा सामना करीत आहोत. त्यामुळे कोरोना विरूद्ध लढा देण्यासाठी आम्ही २१ लाख रुपयांचे योगदान दिले आहे.”
हॉकी इंडियाचे सरचिटणीस राजिंदर सिंह म्हणाले, “हॉकी इंडियाला नेहमीच ओडिशाच्या लोकांकडून मोठा पाठिंबा आणि प्रेरणा मिळाली आहे. मला अभिमान आहे की हॉकी इंडिया कार्यकारी मंडळाने एकमताने ओडिशाच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी योगदान देण्याचा निर्णय घेतला.”