साओ पाउलो - ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी मंगळवारी कोरोनाची लस घेतली. यानंतर त्यांनी, हा दिवस कधीही विसरला जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
ब्राझीलचे ८० वर्षीय महान फुटबॉलपटू पेले यांनी लस घेतानाचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या उजव्या हाताला लस टोचण्यात आली. दरम्यान, तीन वेळा विश्वविजेती ठरलेल्या ब्राझील संघाचे सदस्य राहिलेले पेले यांनी कोणत्या कंपनीची लस घेतली, याचा खुलासा मात्र केलेला नाही.
जगभरासह ब्राझीलमध्ये मागील एक वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू आहे. साओ पाऊलामध्ये देखील कोरोनाचा संसर्ग वाढलेला होता. यामुळे पेले आपल्या घरीच होते. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर पेले यांनी, हा दिवस कधीही विसरला जाऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
अद्याप कोरोना संपलेला नाही. आपल्याला आपला जीव वाचवायचा असेल तर सूचनांचे पालन करायला हवे, असे देखील पेले यांनी सांगितलं. दरम्यान, कोरोनामुळे ब्राझीलमध्ये दोन लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू दरात ब्राझील जगामध्ये दुसऱ्या स्थानी आहे.
हेही वाचा - लिव्हरपूलचे महान फुटबॉलपटू सेंट जॉन यांचे निधन
हेही वाचा - लिव्हरपूलचा कर्णधार हेंडरसन दुखापतीमुळे १० आठवडे मैदानाबाहेर