नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. या व्हायरसमुळे लोकांच्या मनात भितीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, या व्हायरसच्या भितीमुळे फ्रान्सचा फुटबॉल क्लब रीम्सचे डॉक्टर बर्नार्ड गोन्झालेझ (वय 60) यांनी आत्महत्या केली. सूत्रांच्या माहितीनुसार, बर्नाड यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे ते नैराश्यात होते.
या आत्महत्येपूर्वी बर्नार्ड यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत त्यांनी नैराश्याचे कारण लिहिले आहे. बर्नार्ड यांच्या मृत्यूमुळे केवळ खेळाडूच नव्हे, तर रीम्स शहरातील हजारो लोकांचेही मन दुखावले आहे. बर्नार्ड 20 वर्षांपासून क्लबशी संबंधित होते, असे रीम्सने म्हटले आहे.
204 देशांमध्ये कोरोना-मृतांची संख्या सोमवारी पहाटेपर्यंत 69 हजार 424 वर पोहोचली आहे. 12 लाख 72 हजार 860 लोकांना या आजाराची लागण झाली असून उपचारानंतर दोन लाख 62 हजार रूग्ण बरे झाले आहेत.