नवी दिल्ली - भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीची एएफसी आशियाई चषक-2019 चा आवडता खेळाडू म्हणून निवड झाली आहे. ही निवड फॅन पोलमधून करण्यात आली. शनिवारी एशियन फुटबॉल फेडरेशन एएफसीने ही माहिती दिली. एएफसीतर्फे घेण्यात आलेल्या या फॅन पोलमध्ये छेत्रीने उझबेकिस्तानच्या इल्डोर शोमुरोडोव्हचा पराभव केला. फॅन पोलमध्ये छेत्रीला 54 टक्के मते मिळाली तर उझबेकिस्तानच्या खेळाडूला 49 टक्के मते मिळाली.
एएफसीने ट्विटरवर निकाल जाहीर करत घोषणा केली की, "19 दिवस आणि 561,856 मते. आशियाई चषक-2019 चा आवडता खेळाडू निश्चित झाला आहे. सुनील छेत्री यांचे अभिनंदन."
35 वर्षीय छेत्रीने आशियाई चषक स्पर्धेच्या शेवटच्या मोसमात चांगली कामगिरी केली होती. त्याच्या कामगिरीमुळे भारताला अंतिम-16 च्या जवळ पोहोचता आले. छेत्रीने या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात थायलंडविरुद्ध दोन गोल केले. त्यामुळे भारताने हा सामना 4-1ने जिंकला होता.
छेत्रीने भारतासाठी आतापर्यंत 115 सामन्यांत 72 गोल केले आहेत. कोणत्याही भारतीय खेळाडूने केलेले हे सर्वोच्च केले आहेत.