नवी दिल्ली - बायर्न म्युनिक आणि पोलंडचा स्टार फुटबॉलपटू रॉबर्ट लेवंडोवस्कीला फिफाचा यंदाचा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळाला आहे. त्याने या पुरस्काराच्या शर्यतीत पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीचा पाडाव केला. मँचेस्टर सिटी आणि इंग्लंडच्या लुसी ब्राँझला सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा मान मिळाला आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे हा पुरस्कार सोहळा 'व्हर्च्युअली' पार पडला.
हेही वाचा - विराट कोहलीकडून तब्बल ५१ वर्षे जुना विक्रम सर!
दोन्ही खेळाडूंनी आपल्या कारकीर्दीत प्रथमच हा पुरस्कार जिंकला आहे. मेस्सी आणि रोनाल्डो या दिग्गज खेळाडूंनी मागील बारा जेतेपदांपैकी अकरा जेतेपदावर राज्य केले. मात्र, यंदा केलेल्या अतुलनीय कामगिरीच्या जोरावर लेवंडोवस्कीला हा पुरस्कार मिळाला.
पोलंडचा पहिला खेळाडू -
२०१९-२०च्या चॅम्पियन्स लीगमधील १५ गोलच्या जोरावर लेवंडोवस्कीने आपला क्लब बायर्न म्युनिकला विजेता केले होते. तर, मेस्सीला तीन आणि रोनाल्डोला चार गोल करत आले आहेत. ३२ वर्षीय पोलंडच्या लेवंडोवस्कीने यावर्षी बुंडेस्लिगा आणि यूएफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार जिंकला आहे. फिफा पुरस्कार जिंकणारा लेवंडोवस्की बायर्न म्युनिकचा आणि पोलंडचा पहिला खेळाडू आहे. गेल्या वीस वर्षात असे तिसऱ्यांदा झाले आहे की, बार्सिलोना किंवा रियल माद्रिदच्या खेळाडूला हा पुरस्कार जिंकता आला नाही नाही.
बालोन डी ओरचा दावेदार, पण...
उत्कृष्ट कामगिरीमुळे लेवंडोवस्की यंदाच्या प्रतिष्ठित बालोन डी ओर चषकाचा दावेदार ठरला. परंतु कोरोनोव्हायरसमुळे हा पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आला. १९५६ पासून फिफाचा हा पुरस्कार जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूला दरवर्षी दिला जातो. या पुरस्कार निवडीमध्ये १८० सदस्य असतात.
विजेते -
- पुरुष खेळाडू : रॉबर्ट लेवंडोवस्की (पोलंड / बायर्न म्युनिक)
- महिला खेळाडू : लुसी ब्राँझ (इंग्लंड / ल्योन)
- महिला प्रशिक्षक : सरिना विगमन (नेदरलँड्स)
- पुरुष प्रशिक्षक : जर्गन क्लोप (लिव्हरपूल)
- महिला गोलकीपर : सारा बोहाडी (फ्रान्स / ल्योन)
- पुरुष गोलकीपर : मॅन्युएल न्यूअर (जर्मनी / बायर्न म्युनिक)