इंग्लंड : युरो कपच्या अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडला हरवत इटलीने विजेतेपद मिळवलं आहे. अत्यंत रोमांचक अशा या सामन्यात दोन्ही बाजूंनी आक्रमक खेळ पहायला मिळाला. सामना संपताना दोन्ही संघांनी एक-एक गोल केला होता. त्यामुळं निकाल ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊटचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये इटलीने इंग्लंडला ३-२ ने हरवलं.
१९६८ नंतर पहिल्यांदाच इटलीने युरो कपवर आपलं नाव कोरलं आहे. तर दुसरीकडे, गेल्या ५५ वर्षांपासून एकही मोठी टूर्नामेंट न जिंकलेल्या इंग्लंडचा दुष्काळ मात्र कायम राहिला आहे. यावर्षी जिंकायचंच या निश्चयाने मैदानात उतरलेल्या इंग्लंडचं स्वप्न धुळीस मिळालं.
लंडनच्या वेंब्ली मैदानावर हा सामना पार पडला. सुरुवातीच्या काही मिनिटांमध्येच इंग्लंडच्या ल्यूक शॉने गोल करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. पहिला हाफ संपेपर्यंत स्कोअरबोर्ड १-० असा इंग्लंडच्या बाजूने होता. मात्र, दुसऱ्या हाफच्या सुरुवातीलाच इटलीच्या लियोनार्डो बोनुची याने गोल करत बरोबरी साधली. यानंतर पूर्ण सामना होईपर्यंत स्कोअरबोर्ड १-१ असाच राहिला.
त्यानंतर निकाल ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट घेण्यात आलं. यामध्ये इंग्लंडने पहिले दोन गोल केले, मात्र नंतर सलग तीन वेळा त्यांना गोल करता आला नाही. तर इटलीने तीन गोल केले, त्यामुळे ३-२ अशा फरकाने इटलीने हा सामना खिशात घातला.
हेही वाचा : Wimbledon २०२१: जोकोव्हिच एक्सप्रेस सुसाट; बेरेट्टिनीला नमवत पटकावलं विक्रमी ग्रँडस्लॅम विजेतेपद