सेंट पीटर्सबर्ग - यूरो कप २०२०च्या नॉकआउट फेरीतील स्पेन विरुद्ध स्वित्झर्लंड यांच्यातील सामना श्वास रोखायला लावणारा असा झाला. यात स्पेनने पेनाल्टी शूटआउटमध्ये स्वित्झर्लंडचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. स्पेनचा मजबूत संघ फुल्ल टाईम त्यानंतर एक्ट्रा टाईममध्ये देखील एक गोलच करू शकला. स्वित्झर्लंडने देखील एक गोल केला होता. यामुळे हा सामना पेनाल्टी शूटआउटमध्ये गेला आणि यात स्पेनने ३-१ ने बाजी मारली.
स्पेनने सामन्याची सुरूवात धडाक्यात केली. अल्बा याने ८व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. स्पेनला ८व्या मिनिटाला कॉर्नर मिळाला. यात अल्बा याने डीच्या बाहेर जात चेंडूला जोरदार किक मारली आणि गोल केला. पहिला हाफमध्ये स्पेन १-० ने आघाडीवर राहिला. तेव्हा दुसऱ्या हाफमध्ये स्वित्झर्लंडने पलटवार केला. स्वित्झर्लंडचा स्टार खेळाडू शकीरी याने गोल करत सामना बरोबरीत आणला. स्पेनचा डिफेंडर लापोर्ट आणि पाउ टॉरेस यांच्यातील ताळमेळ चूकला आणि याचा फायदा शकीरी याने उचलला.
पेनाल्टी शूटआउटचा थरार...
स्पेन आणि स्वित्झर्लंडचा सामना फुल टाईम त्यानंतर एक्ट्रा टाईममध्ये देखील १-१ अशा बरोबरीत राहिला. यानंतर पेनाल्टी शूटआउटच्या थराराला सुरूवात झाली. पेनाल्टी किकची पहिली संधी स्वित्झर्लंडला मिळाली. पण स्पेनचा गोलकिपर सिमोन याने शानदार बचाव केला. दुसऱ्या संधीवर स्पेनच्या मारियोने गोल करत संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या शॉट डॅनी अल्मोने मारला. यावर त्याने स्पेनसाठी आणखी एका गोलची भर घातली. दुसरीकडे स्पेनचा गोलकिपर सिमोन हा स्वित्झर्लंडच्या संधीवर बचाव करत होता. सिमोनने स्वित्झर्लंडचे ३ गोल रोखत आपल्या संघाला ३-१ ने विजय मिळवून देत उपांत्य फेरीत पोहोचवले.
हेही वाचा - मॅच फिक्सिंग प्रकरणात २ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचे निलंबन
हेही वाचा - माना पटेलने रचला इतिहास, टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू