रोम - यूरो कप २०२० मध्ये इंग्लंड आणि डेन्मार्क या दोन संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीचे अखेरचे दोन सामने शनिवारी उशिरा रात्री पार पडले. यातील पहिल्या सामन्यात इंग्लंडने युक्रेनवर ४-० असा दणदणीत विजय मिळवला. तर डेन्मार्कने चेक रिपब्लिकला २-१ ने नमवत उपांत्य फेरी गाठली.
इंग्लंडने सामन्याच्या सुरूवातीपासून युक्रेनवर दबदबा निर्माण केला होता. सामन्याच्या चौथ्या मिनिटालाच कर्णधार हॅरी केनने पहिला गोल केला. त्यानंतर पहिला हाफ होईपर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यानंतर दुसरा हाफमध्ये इंग्लंडच्या खेळाडूंनी वेगवान खेळ करत एका मागोमाग एक असे तीन गोल केले. ४६व्या मिनिटाला हॅरी मॅगुयरने, ५०व्या मिनिटाला हॅरी केनने आणि ६३ व्या मिनिटाला जॉर्डन हेंडरसनने गोल केला. यासह इंग्लंडने हा सामना ४-० जिंकत थाटात उपांत्य फेरी गाठली.
चेक रिपब्लिकविरुद्धच्या सामन्यात ५व्या मिनिटाला डेन्मार्कच्या जेंस स्ट्राइगर लार्सनने मारलेल्या कॉर्नर किकवर थॉमस डेलाने याने हेडरने गोल करत सामन्यात संघाला १-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हाफ टाईमला काही मिनिटे शिल्लक असताना ४२व्या मिनिटाला जोआकिम मेहलेच्या मदतीने डॉलबर्ग याने गोल करत डेन्मार्कला २-० ची आघाडी मिळवून दिली. हाफ टाईमनंतर चेक रिपब्लिकच्या पॅट्रिक स्किकने ४९व्या मिनिटाला गोल करत सामन्यात वापसी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सामना संपेपर्यंत डेन्मार्कच्या खेळाडूंनी चेक रिपब्लिकच्या खेळाडूंना बरोबरी साधू दिली नाही. डेन्मार्कने हा सामा २-१ ने जिंकत उपांत्य फेरी गाठली.
उपांत्य फेरीत डेन्मार्क-इंग्लंड आमने-सामने
यूरो कप २०२० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंड आणि डेन्मार्क संघ आमने-सामने होणार आहेत. हा सामना ८ जुलैला भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री १२ वाजून ३० मिनिटांनी रंगणार आहे. तर स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना ७ जुलैला इटली आणि स्पेन यांच्यात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री १२ वाजून ३० मिनिटांनी सुरूवात होईल.
हेही वाचा - Wimbledon : रॉजर फेडरर, अलेक्झांडर झ्वेरेव आणि कोको गॉफ चौथ्या फेरीत
हेही वाचा - Ind W Vs Eng W ३rd ODI : स्मृती मंधानाने सीमारेषेजवळ घेतला अफलातून झेल, पाहा व्हिडिओ