तूरिन - कोरोनासंबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो चर्चेत आला आहे. इटलीच्या माउंटन रिसॉर्टवर स्की-ट्रीप केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. एका वृत्तानुसार, रोनाल्डोची मैत्रीण जॉर्जिना रोड्रिगेजने या आठवड्याच्या सुरुवातीला इटलीमधील माउंटन रिसॉर्टमध्ये स्नो मोबाईलवर सवारी करत असतानाचे फुटेज सोशल मीडियावर पोस्ट केले. या घटनेनंतर वेले डीओस्टा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या फुटेजमध्ये रोनाल्डो स्पष्ट दिसत आहे.
हेही वाचा - दुसऱ्या अँजिओप्लास्टीला सामोरा गेला बीसीसीआयचा 'बॉस'
सध्याच्या इटलीच्या कायद्यानुसार, कोरोनाच्या 'ऑरेंज झोन-के'मध्ये वैध मंजुरी प्राप्त होईपर्यंत प्रवास करण्यास मनाई आहे. त्यामुळे रोनाल्डो आणि रोड्रिगेजने नियम तोडल्याचे म्हटले जात आहे. आपला २७वा वाढदिवस साजरा करण्यासाठी जॉर्जिना रोड्रिगेज रोनाल्डोसह प्रतिबंधित क्षेत्रात गेल्याचे समजते. दोषी आढळल्यास या दोघांवर कडक कारवाई होऊ शकते.
काही दिवसांपूर्वी नोंदवला विश्वविक्रम -
काही दिवसांपूर्वी नेपोलीविरुद्ध सामना खेळताना जुव्हेंटसच्या रोनाल्डोने विश्वविक्रम केला. या विक्रमाद्वारे रोनाल्डो फुटबॉलच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला आहे. रोनाल्डोच्या खात्यात आता ७६० गोल झाले आहेत. त्याने जोसेफ बिकनच्या ७५९ गोलच्या विक्रमाला मागे टाकले. स्पॅनिश फुटबॉल क्लब रियाल माद्रिदसाठी रोनाल्डोने सर्वाधिक ३११ गोल केले आहेत. याव्यतिरिक्त त्याने मॅन्चेस्टर युनायटेडसाठी ८४, स्पोर्टिंग सीपीसाठी ३ आणि जुव्हेंटसकडून ६७ गोल केले आहेत.
पोर्तुगाल संघासाठी रोनाल्डोने १७० सामन्यात १०२ गोल केले आहेत. तो पोर्तुगालच्या अंडर-१५, अंडर-१७, अंडर-२०, अंडर-२१ आणि अंडर-२३ संघातही खेळला आहे.