रियो दी जिनेरियो - गतविजेत्या ब्राझील संघाने चिलीचा १-० ने पराभव करत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. दुसरीकडे पेरूने पराग्वेचा पेनाल्टी शूटआउटमध्ये रंगलेल्या सामन्यात ४-३ ने विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
कोपा अमेरिका स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चिलीचा सामना गतविजेत्या ब्राझीलशी झाला. या सामन्यात ब्राझीलचा सबस्टिट्यूट खेळाडू लुकास पाकेटा याने दुसऱ्या हाफमध्ये गोल करत संघाला विजय मिळवून दिला. ब्राझीलने हा सामना १-० ने जिंकला. या सामन्यात ब्राझीलचा खेळाडू गॅब्रियल जीसस याला रेडकार्ड दाखवण्यात आले. यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.
ओलिम्पिको स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात पेरू आणि पराग्वे या दोन्ही संघानी निर्धारित वेळेत प्रत्येकी ३-३ गोल केले. यामुळे एक्ट्रा वेळ देण्यात आला. या देखील सामना बरोबरीत राहिल्याने सामना पेनाल्टी शूटआउटमध्ये गेला. यात पेरूने ४-३ अशी बाजी मारली. पेरूचा गोलकिपर पेड्रो गालेसे याने अलबर्टो एस्पिनोला याने मारलेला शॉटचा यशस्वी बचाव करत संघाला उपांत्य फेरीत पोहोचवले. या सामन्यात दोन्ही संघातील प्रमुख खेळाडूंना रेडकार्ड मिळाले.
विजेते-उपविजेते उपांत्य फेरीत आमने-सामने
उपांत्य फेरीत ब्राझीलची गाठ पेरूशी होणार आहे. उभय संघात २०१९ कोपा अमेरिका स्पर्धेचा अंतिम सामना झाला. यात ब्राझीलने ३-१ ने बाजी मारली होती. आता स्पर्धेचा उपांत्य सामना विजेत्या आणि उपविजेत्या संघात होणार आहे. यात पेरूचा संघ पराभवाचा बदला घेण्याच्या मनसुब्याने मैदानात उतरेल. तर ब्राझील पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहोचण्याच्या उद्देशाने खेळ करेल. दोन तुल्यबळ संघात हा सामना होत असल्याने याची फुटबॉलप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - Euro Cup २०२० : बेल्जियमला नमवत इटली उपांत्य फेरीत, आता गाठ स्पेनशी
हेही वाचा - Euro Cup २०२० : पेनाल्टी शूटआउटमध्ये स्वित्झर्लंडला नमवून स्पेन उपांत्य फेरीत