साओ पाउलो - ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू नेयमारला त्याच्यावर लागलेल्या बलात्काराच्या आरोपातून ब्राझील पोलिसांनी मुक्तता केली आहे. आरोप सिद्ध होण्यासाठी लागणाऱ्या पुराव्याअभावी हे प्रकरण पोलीसांकडून बंद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा अंतिम निकाल न्यायाधीशांमार्फत होणार असून मूल्यमापन करण्यासाठी पोलिसांकडे ५ दिवसांचा कालावधी असणार आहे. नेयमारने त्याच्यावर लागलेल्या आरोपांचे खंडन केले होते. बलात्कार हा शब्द फार गंभीर असून, त्या शब्दाच्या कचाट्यात मी अडकलो आहे, पण जे मला ओळखतात त्यांना माहीत आहे की, मी असे वागूच शकत नाही, असे नेयमारने म्हटले होते.
साओ पाउलो पोलिसात दाखल तक्रारीनुसार, पॅरिसमधील एका हॉटेलमध्ये नेयमारने दारुच्या नशेत बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. मीडिया वृत्तानुसार, ही महिला ब्राझीलची आहे. सोशल मीडियावरून नेयमार आणि या महिलेची ओळख झाली होती.
त्यानंतर याविषयासंबंधी नेयमारने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ अपलोड केला. या व्हिडिओमध्ये नेयमारने स्वत:वर लागलेले आरोप फेटाळले होते. ती महिला मला या प्रकरणात अडकवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा नेयमारने केला होता.