मुंबई - भारतातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या विदेशी खेळाडूंची चिंता वाढली आहे. काही ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएल सोडून मायदेशी परतले आहेत. तर राहिलेल्या खेळाडूंनी मायदेशी परतण्याची व्यवस्था स्वत:च करावी, असे सांगत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी जबाबदारी झटकली आहे. या दरम्यान, बीसीसीआयने सर्व विदेशी खेळाडूंना सुरक्षित घरापर्यंत पोहोचवू, असा विश्वास दिला आहे. आम्ही स्पर्धा संपल्यानंतर कोणत्याही अडथळ्याशिवाय खेळाडूंना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करू, असे बीसीसीआयने म्हटलं आहे.
बीसीसीआयचे सीईओ हेमांग अमीन यांनी खेळाडूंसाठी पत्र लिहलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, 'आयपीएल संपल्यानंतर घरी कसे परत जायचे, या विचारात तुम्ही आहात, याची कल्पना आम्हाला आहे. पण आम्ही तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की, याची चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला घरापर्यंत पोहोचवण्यासाठी बीसीसीआय आपल्याकडून शक्य ती मदत करेल. बीसीसीआय परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. स्पर्धा संपल्यानंतर तुम्हाला तुमच्या देशात पोहोचवण्यासाठी सरकारसोबत मिळून काम करत आहे.'
तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचत नाही, तोपर्यंत बीसीसीआयसाठी ही स्पर्धा संपलेली नाही. याचा आम्ही तुम्हाला विश्वात देतो, असेही अमीन यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, भारतात मागील काही दिवसांपासून दररोज ३ लाखाहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्था कोळमंडली आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन तसेच व्हेंटिंलिटर्सचा तुडवडा होत आहे. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया सरकारने १५ मे पर्यंत भारतातून येणाऱ्या प्रवाशी विमानांना बंदी घातली आहे.
हेही वाचा - IPL २०२१ : 'कोरोना लस घ्यायची की नाही, हे खेळाडूच ठरवतील; विदेशी खेळाडूंना लस नाही'
हेही वाचा - जिंकलस भावा! ब्रेट ली याने भारताला ऑक्सिजन खरेदीसाठी दिली ४२ लाखांची मदत