कराची - कोरोनाच्या प्रसारामुळे जगातील अनेक स्पर्धामध्ये प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नव्हती. पंरतू कोरोनावर मिळवलेल्या नियंत्रणानंतर अनेक नियमांद्वारे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास परवानगी देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीतही प्रेक्षकांना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर येण्याची संधी मिळाली होती. आता पाकिस्तानात खेळवण्यात येणारी टी-२० लीग म्हणजे पाकिस्तान सुपर लीगही (पीएसएल) प्रेक्षकांसह आयोजित करण्यात येणार आहे.
शनिवारपासून सुरू होणाऱ्या या लीगमध्ये स्टेडियमच्या २० टक्के क्षमतेसह प्रेक्षकांना परवानगी देण्यात येणार आहे. पाकिस्तान सरकारने पीएसएलला ही परवानगी दिली असून प्रेक्षकांना सामन्याद्वारे सामाजिक अंतर राखणे आणि मास्क घालणे बंधनकारक असेल.
हेही वाचा - आयपीएल लिलावात 'आश्चर्यचकित' करणारे खेळाडू
या निर्णयाचा अर्थ असा आहे की, कराचीतील नॅशनल स्टेडियममध्ये ७५०० आणि लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर ५५०० प्रेक्षक सामना पाहण्यास सक्षम असतील. क्वेटा ग्लॅडिएटर्सचा यष्टिरक्षक फलंदाज सरफराज अहमद म्हणाला, "प्रेक्षकांशिवाय कोणतीही मजा नाही. खूप दिवसानंतर आम्ही आपल्या प्रेक्षकांसमोर खेळू. ही एक चांगली बातमी आहे."
कोरोनाच्या काळात पीसीबीने झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दोन आंतरराष्ट्रीय मालिका आयोजित केल्या. पण हे सामने रिकाम्या स्टेडियममध्ये खेळविण्यात आले.