विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे होणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचे सावट आहे. विशाखापट्टणममध्ये शनिवारी पाऊस झाला असून आजही पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांचे तिकिटाचे पैसे वाया जाऊ शकतात. आंध्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव एसआर गोपीनाथ रेड्डी यांनी शनिवारी सांगितले की, सामन्यासाठी सुपर सोपर्स आणि स्टेडियममध्ये भूमिगत ड्रेनेजची व्यवस्था आहे.
मैदानाची ड्रेनेज व्यवस्था उत्तम : रेड्डी म्हणाले, 'पावसाच्या वेळी आम्ही केवळ खेळपट्टीच नव्हे तर संपूर्ण आऊटफिल्ड कव्हर करू शकतो. तसेच जमिनीतील ड्रेनेज व्यवस्थाही चांगली आहे. जर काही तास पाऊस पडला तर जमिनीतून पाणी लवकर बाहेर पडेल. मैदान कोरडे झाल्यानंतर खेळ पुन्हा सुरू होऊ शकतो. पाऊस थांबल्यानंतर तासाभरात मैदान तयार होईल. मात्र बराच वेळ पाऊस पडला तर त्याचा परिणाम सामन्यावर होईल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हेड टू हेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 144 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाने 80 सामने जिंकले आहेत. तर भारतीय संघाने 54 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दहा सामने अनिर्णित राहिले. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारत सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. भारताने 17 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.
राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियम : या मैदानावर आतापर्यंत नऊ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने तीन सामने जिंकले आहेत. येथे खेळलेला एक सामना बरोबरीत सुटला आहे. भारताने या मैदानावर नऊ सामने खेळले असून, सात जिंकले आहेत. येथे एका सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले, तर एक सामना बरोबरीत राहिला आहे. ऑस्ट्रेलिया 13 वर्षांनंतर विशाखापट्टणममध्ये सामना खेळणार आहे. या मैदानावर वेगवान गोलंदाज अधिक यशस्वी झाले आहेत. वेगवान गोलंदाजांनी येथे 68 तर फिरकी गोलंदाजांनी 48 बळी घेतले आहेत.
हेही वाचा : Ind vs Aus 2nd ODI : आज ऑस्ट्रेलियालाविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना, भारताचे लक्ष मालिका विजयावर