इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने आपल्या पुरुष क्रिकेट संघाला ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतात जाण्यास परवानगी दिली आहे. 'खेळाला राजकारणात मिसळू नये', असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
'खेळाला राजकारणात मिसळू नये' : 'खेळाला राजकारणात मिसळू नये, असे पाकिस्तानने सातत्याने म्हटले आहे. त्यामुळे आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानने आपला संघ भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांचा प्रभाव आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर पडता कामा नये', असे परराष्ट्र मंत्रालयाच्या या निवेदनात म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, यापूर्वी भारताने आशिया चषकासाठी आपला क्रिकेट संघ पाकिस्तानात पाठविण्यास नकार दिला होता.
'संघाच्या सुरक्षेबाबत चिंता आहे' : पाकिस्तानला आपल्या क्रिकेट संघाच्या सुरक्षेबाबत चिंता आहे. आम्ही ही चिंता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की, पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारत भेटीदरम्यान त्यांची संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित केली जाईल, असे या निवेदनात नमूद केले आहे.
2016 नंतर प्रथमच भारतात येणार : अलीकडेच पाकिस्तानच्या अधिकार्यांनी सुरक्षेची तपासणी करण्यासाठी विश्वचषक स्पर्धा भरवण्यात येणाऱ्या ठिकाणांना भेट दिली होती. 2016 च्या टी 20 विश्वचषकानंतर पाकिस्तानचा क्रिकेट संघ प्रथमच भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. 2012 - 2013 मध्ये पाकिस्तानने भारतात शेवटची मालिका खेळली होती. तेव्हापासून ते फक्त आशिया कप आणि विश्वचषक यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळले आहेत.
विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार : यंदाचे वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीचे आहे. या वर्षी चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अनेक वेळा पाहायला मिळणार आहे. आशिया चषक स्पर्धेत हे दोन्ही संघ एकाच गटात आहेत. स्पर्धेत ते तीन वेळा सामनेसामने येऊ शकतात. तर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ते 15 ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव या सामन्याची तारीख बदलू शकते.
हेही वाचा :