मुंबई - पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने मागील वर्षी तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता आमिरने निवृत्ती मागे घेत पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे संकेत दिले आहेत.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीतीत मोहम्मद आमिर म्हणाला की, 'पाकिस्तान सुपर लीगला सुरूवात होण्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान माझ्या घरी आले होते. त्यांनी निवृत्तीबाबत माझ्याशी प्रदिर्घ चर्चा केली. आमच्यात वेगवेगळ्या विषयावरुन चर्चा झाली. यात खान यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. संघ व्यवस्थापनाने माझ्या व्यक्तव्याचा चूकीचा अर्थ काढल्याची बाब मी त्याच्या कानी घातली. तेव्हा त्यांनी मला याविषयावर मी विचार करेन असे आश्वासन दिले.'
जर सर्वकाही ठिक झाल्यास मी पाकिस्तानसाठी खेळण्यास उपलब्ध असेन, असे देखील आमिरने सांगितलं. दरम्यान, आमिरने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पाकिस्तान बोर्डावर गंभीर आरोप करत निवृत्तीची घोषणा केली होती. आमिर पाकिस्तान क्रिकेट संघाचा अनुभवी गोलंदाज आहे. त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानला अनेक सामने जिंकून दिले आहेत. यामुळे पाकिस्तान बोर्ड त्याची मनधारणी करत असल्याचे बोलले जात आहे. याचाच भाग म्हणून वसीम खान यांनी आमिरची भेट घेतली असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा - WTC Final बाबत सचिनची भविष्यवाणी, सांगितलं कोणाचे पारडं जड
हेही वाचा - WTC Final : केएल राहुल, मयांक अगरवाल यांना विश्रांती तर या 15 शिलेदारांची निवड