नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन दुलीप ट्रॉफी सामन्यांमध्ये खेळणार नाही. खेळाचा ताण कमी करण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले आहे. क्रीडा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये खेळल्या गेलेले सामने आणि आयपीएल 2023 चा वर्कलोड कमी करण्यासाठी ईशानने दुलीप ट्रॉफीमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, तो पुढील आठवड्यात एनसीएमध्ये जाणार आहे. तो तेथे भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी तयारी करणार आहे.
वेस्ट इंडिज दौरा ईशानसाठी महत्वाचा : ईशान किशन आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात वेस्ट इंडिज दौऱ्यापासून करू शकतो, असे मानले जात आहे. कॅरेबियन दौरा हा ईशान किशनच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. तिथे त्याला कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळण्याची खात्री आहे. जर तो भारतीय संघात यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून स्वत:ला प्रस्थापित करू शकला, तर तो तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये सामील होऊ शकतो.
ऋषभ पंतचा पर्याय बनू शकतो : ऋषभ पंतचा पर्याय फक्त ईशान किशनच बनू शकेल, असे मानले जात आहे. कारण दिनेश कार्तिक, ऋद्धिमान साहासारख्या स्पर्धक खेळाडूंची कारकीर्द संपली आहे. त्याचबरोबर श्रीकार भरतला फलंदाजीत एकही चांगली खेळी करता आलेली नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा ऋषभ पंतला पर्याय म्हणून यष्टीरक्षक फलंदाजाचा शोध घेतला जातो तेव्हा दोनच नावे समोर येतात, एक केएल राहुल आणि दुसरे ईशान किशन. प्लेइंग इलेव्हनमध्ये ईशान किशनचा समावेश करण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवण्याचा विचार संघाचे निवडकर्ते करत असल्याचे बोलले जात आहे.
12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौरा : भारत 12 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे. यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ 3 जुलै रोजी रवाना होणार आहे. दुलीप ट्रॉफी 28 जूनपासून बेंगळुरूमध्ये होणार आहे आणि अंतिम सामना 12 ते 16 जुलै दरम्यान एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
हे ही वाचा :