चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. धोनीसोबत संघाचा अनुभवी फलंदाज अंबाटी रायुडू आणि युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यांनीही नेट्समध्ये फलंदाजीला सुरुवात केली. तत्पूर्वी, या खेळाडूंना क्वारंटाइन राहावे लागले आहे. आरटीपीसीआर चाचणीत निगेटिव्ह आल्यानंतर खेळाडूंनी प्रशिक्षणाला सुरुवात केली.
तामिळनाडूचा एन. जगदीसन, आर. साई किशोर आणि सी. हरी निशांत यांनीही धोनी आणि रायुडूबरोबर सराव केला. शिबिरात नवीन गोलंदाज हरिशंकर रेड्डीचाही समावेश झाला आहे. संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ म्हणाले, "सीएसकेच्या खेळाडूंनी क्वारंटाइन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सराव सुरू केला आहे. हळूहळू इतर खेळाडूही संघात सामील होतील."
लेगस्पिनर कर्ण शर्मा आणि भगत वर्मा हेदेखील येत्या काही दिवसात संघात सामील होतील. धोनी बुधवारी येथे दाखल झाला आहे. ९ एप्रिलपासून आयपीएलचा चौदावा हंगाम भारतात सुरू होत आहे. १० एप्रिलला चेन्नईचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळेल.
चेन्नईची मागील हंगामातील कामगिरी -
चेन्नईने १३व्या हंगामात सर्वांना निराश केले. पहिला सामना जिंकल्यानंतर चेन्नईची एक्स्प्रेस गाडी रुळावरून घसरली, ती प्ले ऑफच्या शर्यतीतून बादच झाली. ऋतुराजने अखेरच्या तीन सामन्यात सलग तीन अर्धशतक झळकावत, आपली छाप सोडली.