दुबई - राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगलेल्या सामन्यात बंगळुरूने राजस्थानवर मात केली आहे. प्रथम फलंदाजी करत राजस्थान रॉयल्स संघाने बंगळुरूला 150 धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पद्दीकल या सलामीवीरांनी यशस्वी सुरूवात केली. त्यानंतर श्रीकर भारतच्या 44 धावांच्या खेळीने बंगळुरूचा विजय निश्चित केला होता. सोबतच ग्लेन मॅक्सवेलच्या वादळी खेळीने बंगळुरूने 17.1 षटकात राजस्थानवर सात राखून सहज विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल संघाला 149 धावांपर्यंत मजल मारता आली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा यशस्वी जैस्वाल आणि एविन लुईसने 8.2 षटकात 77 धावांची सलामी दिली. एकवेळ राजस्थानचा संघ 11 षटकात 1 बाद 100 अशा सुस्थितीत होता. तेव्हा बंगळुरूची फिरकी जोडी चहल आणि शाहबाज अहमदने राजस्थानच्या डावाला खिंडार पाडले. अखेरीस राजस्थानला 20 षटकात 9 बाद 149 धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरूकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर चहल, अहमदने प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. बंगळुरूला विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य मिळाले.
बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राजस्थानची एविन लुईस आणि यशस्वी जैस्वाल सलामीवीर जोडी मैदानात आली. या जोडीने बंगळुरूच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. दोघांनी 8.2 षटकात 77 धावांची सलामी दिली. डॅन ख्रिश्चियनने यशस्वीला बाद करत ही जोडी फोडली. यशस्वीने 22 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 31 धावांची खेळी केली.
यशस्वीचा झेल मोहम्मद सिराजने घेतला. यानंतर संजू सॅमसन मैदानात आला. दुसरीकडून लुईसने फटकेबाजी केली. त्याने आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर जॉर्ज गार्टन याने त्याला बाद केले. लुईसने 37 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 58 धावांची खेळी साकारली. त्याचा झेल श्रीकर भरतने घेतला. एविन लुईस पाठोपाठ महिपाल लोमरोर (3) माघारी परतला. त्याची विकेट युझवेंद्र चहलने घेतली.
शाहबाज अहमदने 14व्या षटकात राजस्थानला दोन जबर धक्के दिले. त्याने पहिल्या चेंडूवर संजू सॅमसनला बाद करत मोठा अडथळा दूर केला. संजूने 15 चेंडूत 2 षटकारांसह 19 धावांचे योगदान दिले. त्याचा झेल देवदत्त पडीक्कलने घेतला. यानंतर शाहबाजने राहुल तेवतियाला (2) बाद केले. यामुळे राजस्थानची अवस्था 14 षटकानंतर 5 बाद 117 अशी झाली.
रियान पराग-लियान लिविंगस्टोन जोडीने राजस्थानची गळती थांबवली. दोघांनी एकेरी दुहेरी धाव घेत धावफलक हलत ठेवला. पण 17व्या षटकात चहलने लिविंगस्टोनला (6) माघारी धाडलं. यानंतर रियान पराग (9), ख्रिस मॉरिस (14) ठराविक अंतराने बाद झाले. अखेरीस राजस्थानला 20 षटकात 9 बाद 149 धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरूकडून हर्षल पटेलने सर्वाधिक 3 गडी बाद केले. तर चहल, अहमदने प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. तर ख्रिश्चियन आणि गार्टन यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.