लखनौ : टाटा आयपीएल 2023 चा 30 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सवर 7 धावांनी रोमांचक विजय मिळवला आहे.
केएल राहुलची संथ खेळी : गुजराज टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने लखनौसमोर विजयासाठी 136 धावांचे लक्ष ठेवले होते. मात्र या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणेही लखनौच्या संघाला जड गेले. लखनौकडून कर्णधार केएल राहुलने अत्यंत संथ खेळी केली. तो 61 चेंडूत 68 धावा करून शेवटच्या षटकात बाद झाला. शेवटच्या षटकात लखनौला विजयासाठी 12 धावांची आवश्यकता होती. मात्र या षटकात मोहित शर्माने 2 विकेट घेतल्या तर दोघे रन आउट झाले.
शुभमन गिल शून्यावर बाद : प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सचा युवा सलामीवीर शुभमन गिल दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शून्य धावांवर बाद झाला. त्याला क्रुनाल पंड्याने रवि बिश्नोईच्या हाती झेलबाद केले. आज गुजरात टायटन्सने त्यांच्या फलंदाजीच्या क्रमवारीत थोडा बदल केला. पहिली विकेट पडल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. हार्दिक पंड्या आणि वृद्धिमान साहा वगळता गुजरातचा एकही फलंदाज मोठी पारी खेळण्यात अपयशी ठरला. हार्दिक पंड्याने 50 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 66 धावा केल्या तर साहाने 37 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 47 धावा केल्या. लखनौकडून क्रुनाल पंड्या आणि मार्कस स्टॉइनिसने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
गुजरात टायटन्सची प्लेइंग 11 : वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा ; बदली खेळाडू - जोश लिटल, जयंत यादव, शिवम मावी, साई किशोर, श्रीकर भारत.
लखनौ सुपर जायंट्सची प्लेइंग 11 : के.एल. राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, नवीन - उल - हक, अमित मिश्रा, आवेश खान, रवी बिश्नोई ; बदली खेळाडू - जयदेव उनाडकट, कृष्णप्पा गौतम, डॅनियल सॅम्स, प्रेरक मंकड, कर्ण शर्मा.
हे ही वाचा : MS Dhoni With SRH Team : माहीने दिल्या हैदराबादच्या युवा खेळाडूंना टिप्स, पहा व्हिडिओ