नवी दिल्ली : आयपीएल 2023 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादवर 7 धावांनी विजय नोंदवला. मात्र या सामत्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हर रेटमुळे डेव्हिड वॉर्नरवर हा दंड ठोठावण्यात आला आहे. दोन्ही संघांमधील हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला.
पॉइंट्स टेबलमध्ये दिल्ली शेवटच्या स्थानी : डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. या 7 सामन्यांपैकी दिल्लीला केवळ 2 सामने जिंकण्यात यश आले आहे. सध्या दिल्लीचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये 10 व्या म्हणजेच तळाच्या स्थानी आहे. या सामन्यानंतर डेव्हिड वॉर्नरच्या विजयाचा आनंद बीसीसीआयने फिकट केला. बीसीसीआयने वॉर्नरवर ऑन - फिल्डिंग 12 लाख रुपयांचा दंड लगावला आहे.
एक मॅच 3 तास 20 मिनिटांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट : बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, आयपीएलच्या आचारसंहितेनुसार स्लो ओव्हर रेटसाठी चालू हंगामातील हा संघाचा पहिला गुन्हा आहे. त्यामुळे कर्णधार डेव्हिड वॉर्नरला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. वृत्तानुसार, आयपीएलची एक मॅच 3 तास 20 मिनिटांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र स्लो ओव्हर रेट हा एक गंभीर मुद्दा बनत चालला आहे, ज्यामुळे बहुतेक सामने 4 तासांपेक्षा जास्त काळ लांबले आहेत.
विराट कोहलीलाही ठोठावला दंड : रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर विराट कोहलीच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. मात्र या सामन्यात विराट कोहलीने स्लो ओव्हर - रेट राखल्यामुळे त्याला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. IPL 2023 मध्ये आरसीबीने दुसऱ्यांदा स्लो ओव्हर - रेट राखला आहे. त्यामुळे त्यांच्या दंडात वाढ करण्यात आली आहे.