मुंबई - मराठी भाषेचा विस्तार आणि वापर मोठ्या प्रमाणात हवा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच सक्रिय असते. मनसेच्या वतीने काही वर्षात आंदोलनेही करण्यात आली आहे. जलद क्रिकेटसाठी प्रसिद्ध असणारे इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल क्रिकेट सामन्यांचे समालोचन मनसेच्या मागणीनंतर आता मराठीत होणार आहे.
आयपीएल क्रिकेट सामन्यांचे समालोचन मराठीत व्हावे, यासाठी मनसेच्या वतीने स्टार इंडिया व्यवस्थापनाकडे पाठपुरवठा सुरू होता. स्टार इंडिया समुहाने त्यांची मागणी मान्य केली आहे. याचे पत्र स्टार इंडियाने मनसेला पाठवले आहे.
मराठी क्रीडा वाहिनीसाठीही पाठपुरावा
आयपीएल सामन्यांचे मराठीत समालोचन व्हावे, यासाठी नोव्हेंबर 2020 पक्षातर्फे पाठपुरावा सुरू होता. बाकीच्या प्रादेशिक भाषेमध्ये आयपीएलचे समालोचन होत होते. मात्र मराठीत होत नव्हते. यासाठी आम्ही स्टार इंडिया समुहाकडे पाठपुरावा सुरू केला होता. कोरोनामुळे ही मागणी पूर्ण होण्यासाठी काही उशीर झाला. मात्र शेवटी त्यांनी आमची मागणी मान्य करत पत्र लिहिलेले आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मराठी भाषेचा समावेश केलेला आहे, असे या पत्र सांगितले आहे. मराठी क्रीडा वाहिनीदेखील सुरू व्हावी, यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे असे मनसेचे केतन नाईक यांनी सांगितले.
आयपीएलचे वेळापत्रक जाहीर
आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलने १४व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. करोना व्हायरसचे रुग्ण वाढत असले तरी ही स्पर्धा या वर्षी भारतात होणार आहे. या हंगामाचे सामने अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या शहरत होणार आहेत. पहिली लढत ९ एप्रिल रोजी चेन्नईत होईल. ही लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. तर, नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्लेऑफच्या लढती आणि ३० मे रोजी अंतिम सामना रंगणार आहे.
हेही वाचा - Vijay Hazare Trophy : मुंबईची अंतिम फेरीत धडक, पृथ्वी शॉची तुफानी खेळी