IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सचा मुंबई इंडियन्सवर 20 धावांनी विजय - चेन्नई समर्थक
ऋतुराज गायकवाडच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 157 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करत असतांना मुंबई इंडियन्स 20 ओवरमध्ये आठ विकेटवर 136 धावा बनवू शकली. चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सची दमछाक करत 20 धावांच्या फरकाने पराभव केला.
दुबई - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राला सुरूवात झाली आहे. दुसऱ्या सत्रातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऋतुराज गायकवाडच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 157 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करत असतांना मुंबई इंडियन्स 20 ओवरमध्ये आठ विकेटवर 136 धावा बनवू शकली. चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सची दमछाक करत 20 धावांच्या फरकाने पराभव केला. या विजयाने चेन्नईने गुणतालिकेत १२ गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे.
मुंबईचा डाव -
चेन्नईची खेळी झाल्यानंतर क्विंटन डिकॉक आणि अनमोलप्रित सिंगने मुंबईच्या डावाला सुरूवात केली. दीपक चाहरने डिकॉकला अवघ्या 17 धावात तंबूत पाठवले. चाहरनेच अनमोलप्रित सिंगला बाद करत संघाला आणखी एक यश मिळवून दिले. सिंगनंतर शार्दुल ठाकूरने सूर्यकुमार यादवला परत पाठवले. सौरभ तिवारीचे अर्धशतक वगळता एकाही खेळाडूला चेन्नईने मैदानात धग धरू दिली नाही. कुणाल पांड्याही अवघ्या 4 धावा करून बाद झाला. मुंबई असा दमछाक करत चेन्नईने सामन्यात बाजी मारली.
चैन्नईचा डाव -
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. पहिल्याच षटकात सलामीवीर फाफ डू प्लेसिस भोपाळाही न फोडता झेलबाद झाला. त्याला बोल्टने मिल्नेकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर मोईन अली देखील शुन्यावर बाद झाला. त्याची विकेट मिल्ने याने घेतली. तर झेल सौरभ तिवारीने घेतला. यानंतर सुरेश रैना अवघ्या चार धावा करुन तंबूत परतला. तेव्हा महेंद्रसिंग धोनीकडून चेन्नईच्या संघाला खूप अपेक्षा होती. मात्र, धोनी देखील वैयक्तिक तीन धावांवर बाद झाला. त्याची शिकार मिल्ने याने केली.ऋतुराज गायकवाडने एक बाजू लावून धरली होती. धोनी बाद झाल्यानंतर आलेल्या रविंद्र जडेजाने त्याला चांगली साथ दिली. या जोडीने चांगली भागीदारी करत धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला. रविंद्र जडेजा 26 धावा करून झेलबाद झाला. तेव्ह मैदानात आलेल्या ड्वेन ब्राव्होने आक्रमक फटके मारले. त्याने 3 षटकार लगावत 23 धावा केल्या. शार्दुल ठाकूरने 1 धाव केली. मुंबईकडून बोल्ट, बुमराह आणि मिल्ने यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
ऋतुराजला सामनावीर पुरस्कार -
सलामीला आलेल्या ऋतुराजने 58 चेंडूचा सामना करत धावा नाबाद 88 केल्या. यामध्ये 4 षटकार आणि 9 चौकार यांचा समावेश आहे. ऋतुराजला रविंद्र जडेजाने 26 धावा करत चांगली साथ दिली. ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
चेन्नईची प्लेईंग इलेव्हन-
फाफ डू प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाटी रायुडू, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार), ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर आणि जोश हेडलवुड.
मुंबईची प्लेईंग इलेव्हन -
क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, अनमोलप्रीत सिंह, कृणाल पांड्या, केरॉन पोलार्ड (कर्णधार), सौरभ तिवारी, एडम मिल्ने, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट.
हेही वाचा - IPL 2021 : ऋतुराजची झुंजार खेळी; मुंबई समोर विजयासाठी 157 धावांचे आव्हान