मुंबई - चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी क्रिकेटमधील बारकावे जाणतो. यामुळेच 'धोनी हा फक्त एक खेळाडू नसून तो क्रिकेटचे एक संपूर्ण युग आहे', असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने धोनीविषयी बोलताना व्यक्त केले होते. धोनीची क्रिकेट खेळाविषयी असलेल्या सखोल जाणची प्रतिची राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पुन्हा पाहावयास मिळाली.
आयपीएल २०२१ मध्ये सोमवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १८८ धावा केल्या. चेन्नईच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ मजबूत स्थितीत होता. जोस बटलर (४९) आणि शिवम दुबे या दोघांमध्ये ४५ धावांची भागिदारी पूर्ण झाली होती.
चेन्नईसाठी बटलर-दुबे ही जोडी डोकेदुखी ठरणार असे वाटत होते. तेव्हा धोनीने १०वे षटक फेकण्यासाठी रविंद्र जडेजाला पाचारण केले. जडेजाने आपल्या षटकातील पाचव्या चेंडूवर नो बॉल फेकला आणि त्या चेंडूवर बटलरने षटकार ठोकला. चेंडू थेट स्टॅडमध्ये गेला त्यामुळे पंचांनी दुसरा चेंडू दिला. चेन्नईला ओल्या चेंडू ऐवजी कोरडा असलेला चेंडू मिळाला आणि सामन्याचे चित्र पालटले.
पंचांनी नवा चेंडू दिल्यानंतर धोनी यष्ट्ट्यामागून म्हणाला, चेंडू कोरडा आहे. त्यामुळे तो वळेल. झालेही तसेच १२ व्या षटकात जडेजाने बटलरला क्लिन बोल्ड केलं. नंतर शिवम दुबेला पायचित करत त्याला माघारी धाडलं. यानंतर मोईन अलीने डेव्हिड मिलरला (२) माघारी पाठवलं. रियान पराग आणि ख्रिस मॉरिस त्यानंतर स्वस्तात बाद झाले. मोईन अलीने तीन षटकात ७ धावा देत ३ गडी बाद केले. तर जडेजाने दोन गडी बाद केले. या शिवाय जडेजाने या सामन्यात चार झेल टिपले. परिणामी राजस्थानचा संघ २० षटकात ९ बाद १४३ धावा करू शकला.
हेही वाचा - IPL २०२१ : गतविजेते-उपविजेते यांच्यात आज कडवी झुंज
हेही वाचा - IPL २०२१ : चेन्नईने मुंबई आणि दिल्लीला दिला धक्का, गुणतालिकेत घेतली भरारी