चेन्नई - दिल्ली कॅपीटल्सने सनरायझर्स हैदराबादला सुपर ओव्हरमध्ये हरवून विजय नोंदवला आहे. सुपर ओव्हरमध्ये हैदराबादने दिल्लीला ८ धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान शिखर धवन आणि ऋषभ पंत यांनी पूर्ण केलं. हैदराबादने या ८ रन रोखायला राशिद खानला बॉलिंग दिली, मात्र, ऋषभ पंतने तिसऱ्या बॉलला चौकार मारून दिल्लीचा विजय सोपा करुन विजयावर शिक्कामोर्तब केला.
सामना टाय, सुपर ओव्हरचा निर्णय
दिल्लीने दिलेल्या 160 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैदराबादने २० षटकांत ७ विकेट गमावून १५९ धावा केल्या. यामुळे सामन्यात सुपर ओव्हरचा थरार रंगला.
कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या सलामीवीर जोडीने दिल्लीला दमदार सलामी दिली. या दोघांनी १०.२ षटकात ८१ धावांची सलामी दिली. राशिद खानच्या फिरकी जाळ्यात शिखर धवन अडकला. त्याने २६ चेंडूत २८ धावा केल्या. तेव्हा पुढच्या षटकात पृथ्वी शॉ धावबाद झाला. शॉ याने ३९ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारासह ५३ धावा केल्या. त्यानंतर पंत आणि स्टिव्ह स्मिथ या जोडीने दिल्लीला शतकी टप्पा पार करून दिला.
पंत फटकेजाबीच्या नादात झेलबाद झाला. कौलच्या गोलंदाजीवर त्याचा झेल सुचितने टिपला. पंतने ३७ धावा केल्या. पंतपाठोपाठ हेटमायर (१) देखील बाद झाला. स्मिथने दुसरी बाजू लावून धरत नाबाद ३४ धावा केल्या. यात ३ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. हैदराबादकडून सिद्धार्थ कौलने दोन गडी बाद केले. तर राशिदने एक विकेट घेतली.
हेही वाचा - राजस्थान रॉयल्सच्या अडचणीत पुन्हा वाढ; 'या' खेळाडूने सोडली संघाची साथ
हेही वाचा - CSK vs RCB: होय, एकट्या जडेजाने आमचा पराभव केला; विराटची कबुली