मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा १० गडी राखून पराभव केला आणि गुणतालिकेत अव्वलस्थान काबीज केले. राजस्थानने बंगळुरूपुढे विजयासाठी १७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. राजस्थानचे हे आव्हान बंगळुरू संघाने १६.३ षटकात बिनबाद पूर्ण केले. सलामीवीर देवदत्त पडीक्कलने ५२ चेंडूत नाबाद (१०१) शतक झळकावले. यात ११ चौकार आणि ६ षटकारांच्या समावेश आहे. कर्णधार विराट कोहलीने ४७ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारासंह नाबाद ७२ धावांची खेळी केली. बंगळुरूचा स्पर्धेतील हा सलग चौथा विजय ठरला.
तत्पूर्वी, बंगळुरूने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. तेव्हा राजस्थानची सुरूवात खराब झाली. मोहम्मद सिराजने जोस बटलर (८) क्लिन बोल्ड करत राजस्थानला पहिला हादरा दिला. त्यानंतर कायले जेमिसनच्या गोलंदाजीवर ऊंच फटका मारण्याच्या नादात मनन वोहरा (७) बाद झाला. त्याचा झेल केन रिचर्डसनने टिपला. सिराजने डेव्हिड मिलरला शून्यावर पायचित करत राजस्थानला बॅकफूटवर ढककले. राजस्थानची अवस्था ४.३ षटकात ३ बाद १८ अशी झाली. तेव्हा संजू सॅमसनवर संघाची भिस्त होती. मात्र तोही कमाल करु शकला नाही. संजू सॅमसन १८ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. सुंदरच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या नादात तो ग्लेन मॅक्सवेलच्या हाती झेल देऊन बसला.
संजू सॅमसन बाद झाल्यानंतर शिवम दुबे आणि रियान पराग या जोडीने राजस्थानाला शतकी टप्पा गाठून दिला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी ६६ धावांची भागिदारी केली. हर्षल पटेलने ही जोडी फोडली. त्याने रियान परागला चहलकडे झेल देण्यास भाग पाडलं. पराग १६ चेंडूत २५ धावा केल्या. केन रिचर्डसनने शिवम दुबेला बाद करत राजस्थान संघाला सहावा धक्का दिला. दुबेने ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४६ धावा केल्या. त्याचा झेल मॅक्सवेलने घेतला. यानंतर तेवतिया आणि ख्रिस मॉरिस जोडीने राजस्थानला दीडशेचा टप्पा गाठून दिला.
डेथ ओव्हरमध्ये मॉरिस-तेवतिया या दोघांनी बंगळुरूच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. तेवतिया १९ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर बाद झाला. त्याने २२ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावांची खेळी केली. शाहबाज अहमदने त्याचा झेल टिपला. अखेरच्या २०व्या षटकातील पहिल्या चेंडूवर मॉरिस (१०) बाद झाला. हर्षल पटेलच्या स्लोवर चेंडूवर तो चहलकडे झेल देऊन बसला. अखेरीस राजस्थानचा संघाने २० षटकात ९ बाद १७७ धावांपर्यंत मजल मारली. बंगळुरूकडून सिराज आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. सुंदर, जेमिन्सन आणि रिचर्डस यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.