चेन्नई - आयपीएल २०२१ मध्ये डबल हेडरमधील आजचा पहिला सामना सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात चेन्नईमध्ये रंगला आहे. या सामन्यात पंजाबचा कर्णधार के एल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. खलील अहमद, अभिषेक शर्मा यांच्यासह हैदराबाद इतर गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. हैदराबादच्या माऱ्यासमोर पंजाबचा संघ २० षटके देखील पूर्ण खेळू शकला नाही. पंजाबचा संघ १९.४ षटकात १२० धावांवर ऑलआऊट झाला. हैदराबादला विजयासाठी १२१ धावांचे आव्हान मिळाले आहे.
पंजाबची सुरूवात खराब झाली. फॉर्मात असलेल्या राहुल ४ धावांवर बाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याला केदार जाधवकरवी झेलबाद केले. त्यानंतर मयांक अग्रवाल आणि ख्रिस गेल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी पॉवर प्लेमध्ये ३२ धावा फलकावर लावल्या. पॉवर प्लेच्या संपल्यानंतर पुढील षटकात अग्रवाल बाद झाला. खलील अहमदने अग्रवालला (२२) बाद केले. अग्रवालचा अप्रतिम झेल राशिद खानने टिपला. यानंतर निकोलस पूरन धावबाद होऊन आल्या पाऊले माघारी परतला. राशिद खानने ९व्या षटकात ख्रिस गेलला (४७) पायचित करत पंजाबला मोठा धक्का दिला.
दीपक हुडा स्थिरावल्याचे भासत असताना त्याला अभिषेक शर्माने पायचित केले. तेव्हा पंबाजची अवस्था ११.३ षटकात ६३ अशी झाली होती. यानंतर मोईजेस हेनरिक्स आणि शाहरूख खानने पंजाबचा किल्ला लढवला. पण अभिषेक शर्माच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मोठा फटका मारण्याच्या नादात हेनरिक्स बाद झाला. तेव्हा शाहरूखने फँबियन एलनला सोबत घेत पंजाबला शतकी टप्पा गाठून दिला.
खलील अहमदने एलनला (६) वॉर्नरकडे झेल देण्यास भाग पाडले. डेथ ओव्हरमध्ये मोठा फटका मारण्याच्या नादात शाहरूख झेलबाद झाला. त्याने २२ धावा केल्या. अखेरीस पंजाबचा संघ १२० धावांवर ऑलआऊट झाला. हैदराबादकडून खलीलने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर अभिषेक शर्मा २, राशिद खान, भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
हेही वाचा - IPL २०२१ : जस्सी भाऊ काय केलंस हे! बुमराहच्या नावे IPLच्या इतिहासातील लाजिरवाणा विक्रम
हेही वाचा - IPL २०२१ : कोलकात्यासमोर चेन्नईचे आव्हान, धोनी-मॉर्गन आमनेसामने