मुंबई - चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपल्या सहकाराऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. सद्या धोनीच्या त्या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. चेन्नईच्या संघातील सर्व खेळाडू जोपर्यंत त्यांच्या घरी सुखरूप पोहोचत नाहीत, तोपर्यंत धोनी घरी परतणार नाही.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा चौदावा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. त्यामुळे सर्व संघातील खेळाडू आणि सहकारी आपापल्या घरी परतू लागले आहेत. पण ऑस्ट्रेलियासह काही देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. त्यामुळे विदेशी खेळाडूंना मायदेशी कसे परतायचे हा प्रश्न पडला आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या खेळाडूंसाठी खास चार्टर्ड विमानांची सोय केली आहे. तसेच मुंबईने अन्य फ्रँचायझींनाही त्यांच्या परदेशी खेळाडूंना सोबत पाठवण्यास सांगितले आहे.
चेन्नई सुपर किंग्जच्या एका सदस्याने एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना सांगितलं की, 'धोनीने चेन्नईच्या खेळाडूंशी झालेल्या मीटिंगमध्ये सांगितलं की, तो सर्वात शेवटी हॉटेलमधून बाहेर पडणार आहे. परदेशातील खेळाडू सर्वात अगोदर जातील, त्यानंतर भारतीय खेळाडू आपापल्या घरी परततील. जेव्हा सर्व सहकारी सुरक्षितपणे आपापल्या घरी परततील त्यानंतरच धोनी घरी जाणार आहे.'
दरम्यान, मुंबई इंडियन्स त्यांच्या परदेशी खेळाडूंना ज्या चार्टर्ड विमानाने मायदेशी पाठवणार आहे. ते विमान न्यूझीलंड, वेस्ट इंडिज मार्गे दक्षिण आफ्रिकेला जाणार आहे.
हेही वाचा - क्रिकेटर वेदा कृष्णमूर्तीबरोबर नियतीचा क्रूर खेळ; आईनंतर बहिणीचा कोरोनाने मृत्यू
हेही वाचा - IPL २०२१ : मुंबई इंडियन्स परदेशी खेळाडूंना चार्टर्ड फ्लाईट्सने मायदेशी पाठवणार