अहमदाबाद - पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दिलेल्या १३२ धावांच्या सलामीच्या जोरावर दिल्लीने कोलकाताचा ७ गडी राखून पराभव केला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीपुढे विजयासाठी १५५ धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीने हा सामना १६.३ षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात सहज जिंकला. पृथ्वी शॉ याने ४१ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला.
कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्लीला पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या जोडीने १३.५ षटकात १३२ धावांची सलामी दिली. कमिन्सने शिखरला पायचित केलं. शिखरने ४७ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारांसह ४६ धावा केल्या. दुसऱ्या बाजूने शॉ याने कोलकात्याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत अर्धशतक झळकावले. त्याला कमिन्सने राणाकडे झेल देण्यास भाग पाडलं. शॉ यानं ४१ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावांची ताबडतोड खेळी केली. यानंतर ऋषभ पंतला (१६) देखील कमिन्सने बाद केलं. मार्कस स्टॉयनिस आणि शिमरोन हेटमायर यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. केकेआरकडून कमिन्सने तीन गडी बाद केले.
तत्पूर्वी, दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा कोलकाताच्या सलामीवीरानी संथ सुरुवात केली. २५ धावांची भागीदारी झाल्यानंतर अक्षर पटेलने कोलकाताला पहिला धक्का दिला. अक्षरच्या गोलंदाजीवर नितीश राणाला वैयक्तिक १५ धावांवर यष्टिचित झाला. त्यानंतर शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी यांनी पहिल्या पॉवर प्लेपर्यंत ४५ धावा फलकावर लावल्या. अर्धशतकी भागीदारीकडे कूच करत असताना मार्कस स्टॉयनिसने १०व्या षटकात राहुल त्रिपाठीला (१९) माघारी धाडले.
राहुलनंतर आलेला कर्णधार इयॉन मॉर्गन भोपळाही फोडू शकला नाही. ललित यादवने त्याला स्टिव्ह स्मिथकडे झेल देण्यास भाग पाडले. याच षटकात ललितने सुनील नरिनलाही शून्यावर बाद केले. अवघ्या १० धावांत कोलकाताने ३ गडी गमावले. मागील काही सामन्यात अपयशी ठरलेला शुबमन गिल या सामन्यात चांगल्या लयीत दिसत होता. मात्र, १३व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला. आवेश खानने त्याला वैयक्तिक ४३ धावांवर स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद केले. शुबमनने आपल्या खेळीत ३ चौकार आणि एक षटकार लगावला.
आंद्रे रसेल आणि दिनेश कार्तिक या जोडीने केकेआरला शतकी टप्पा पार करून दिला. पण अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर कार्तिक वैयक्तिक १४ धावांवर पायचित झाला. तेव्हा रसेलने अखेरच्या हाणामारीच्या षटकात फटकेबाजी करत केकेआरला १५४ धावापर्यंत मजल मारून दिली. रसेलने २७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ४५ धावा केल्या. कमिन्स ११ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीकडून अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर आवेश खान आणि स्टॉयनिस यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.